म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : निमगाव वायाळ परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या पात्रातून होणारी रेतीची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्यांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेवेळी सुमारे ४० रेतीमाफिया हजर होते, अशी माहिती आहे.काय घडलं?निमगाव वायाळ येथील नदीपात्रात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती मंगळवारी रात्री गस्तीवर असलेल्या महसूलच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने तलाठी यशवंत घरजाळे आणि विष्णू थोरात तत्काळ नदीपात्रात गेले. ४०-४५ मजुरांच्या माध्यमातून चार ट्रॅक्टरमध्ये रेती भरणे सुरू असल्याचे दिसले. हा प्रकार पाहताच घरजाळे आणि थोरात यांनी मोबाइलमध्ये शूटिंग सुरू केले. चारही ट्रॅक्टर ताब्यात घेतले. मजूर आणि चारही ट्रॅक्टरचे चालक घटनास्थळावरून पसार झाले. थोड्याच वेळातच हातात फावडे घेऊन आलेल्या ४०-४५ मजुरांनी पथकाला शिवीगाळ सुरू केली. एकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरचा पाठलाग केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन एक ट्रॅक्टर पकडला. पण, इतर तीन ट्रॅक्टर पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांत भादंवि कलम ३५३, ३७९, ५०६, १४३, १४७, १४९ व सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८ (७), ४८ (८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस अंमलदार रमेश गोरे करीत आहेत.जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्षबुलढाणा जिल्ह्यात पूर्णासह अनेक नदी पात्रांतून रेतीमाफियांनी बेकायदा उपसा सुरू केला आहे. दिवसाढवळ्या शेकडो टिप्पर आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीची तस्करी केली जात आहे. या माफियांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महसूल विभाग सज्ज झाला आहे. कारवाईचे धोरण आखण्यात आले आहे. पण, महसूलच्या पथकांवर हल्ले करण्याइतपत मजल गेल्याने कडक कारवाईची गरज व्यक्त होऊ लागली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील याविषयी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9MUvzbY
No comments:
Post a Comment