अमरावती: गेल्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभेच्या जागेवरून महाभारत रंगल्याचं पहायला मिळत आहे. त्यावरून कालच माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी राणांविरोधात दंड थोपटले असल्याचं पहायला मिळाले. अमरावतीच्या जागेवर खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर बच्चू कडू यांनी राणा यांना तिकीट देण्यात आल्याने राणांना आपला विरोध कायम असल्याचे म्हटलं आहे. बच्चू कडू यांनी सांगितले की, भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचं काम केलं आहे. पण आता आम्ही आमचं काम करू. नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे आम्ही त्यांचे काम करू शकत नाहीत. जर आम्ही राणांचं काम केलं तर आमचा पक्ष फुटला. जर प्रहारच राहणार नसेल तर आम्ही राणांचे काम कसं करू? त्यापेक्षा आम्ही युतीतून बाहेर पडणं पसंत करू. त्याचीच परवानगी काल रात्री आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ तारखेला बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरही आज भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आम्ही अपक्ष निवडणूक लढू, असं म्हणत अमरावतीच्या जागेवरून बच्चू कडू यांनी थेट इशारा दिला आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर होताच नवं महाभारत रंगल्याचं पहायला मिळत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/X5L3wpt
No comments:
Post a Comment