सांगली: जिल्हा खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरला आहे. जतमधील खुनाची घटना ताजी असतानाच सांगली शहरांमध्ये पुन्हा एका गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. अश्विन कुमार मल्हारी मुळके असे मयत गुन्हेगाराचे नाव आहे. तर या हल्ल्यात गणेश महादेव हाताळे हा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विन कुमार मल्हारी मुळके हा नवीन वसाहतमध्ये राहण्यास आहे. गुरुवारी मध्यरात्री तो घराजवळ थांबला होता. त्यावेळी तेथून कुणाल पवार आणि विकी पवार हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी अश्विन कुमार मुळके याने या भागातून दुचाकी जात नाही, तुम्ही पाठीमागून जा, असे सांगितले. यावेळी दोघांनी तू कोण सांगणार असे म्हणून त्याच्याशी वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्या दोघांनी अजय खोत आणि सुजित चंदनशिवे या दोघांना घटनास्थळी बोलावून घेतले.दोघे आल्यानंतर वाद पुन्हा वाढला. परंतु वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील झाला. याचवेळी एकाने अश्विन कुमार याच्यावर हल्ला केला. प्रति हल्ल्यामध्ये अश्विन कुमारने देखील एकाच्या डोक्यात फरशी घातली. त्यामुळे वाद पुन्हा विकोपाला गेला. यावेळी झटापटीत एकाने अश्विन कुमारच्या पोटात धारदार हत्याराने खुपसले. हा हल्ला होताच गणेश हाताळे हा देखील भांडण सोडण्यासाठी मध्ये आला. त्यामुळे संशयितांनी त्याच्यावर देखील हल्ला केला. हत्याराचा पोटात वर्मी घाव बसल्याने अश्विन कुमार मुळके हा जागेवरच कोसळला. किरकोळ कारणावरुन झालेल्या वादावादीतून अश्विन कुमारचा खून झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संशयित हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी देखील अजय खोत, सुजित चंदनशिवे, कुणाल पवार, विकी पवार, गणेश ऐवळे, अमोल कुंचीकोरवी आणि अर्जुन पवार यांना कर्नाटकातून अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3JthITo
No comments:
Post a Comment