म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकीय बैठकांचा जोर वाढला आहे. महाविकास आघाडीच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून, आज, गुरुवारच्या बैठकीत जागावाटप सूत्रावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन महायुतीत सहभागाचे स्पष्ट संकेत दिलेल्या यांच्या मनसेचीही आज बैठक होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या शनिवारी लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. मात्र, अद्याप महाविकास आघाडीसह महायुतीचे जागावाटप निश्चित झालेले नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांची दिल्लीवारी सुरू असून, जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यासाठी सर्वांची लगीनघाई सुरू आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच महायुतीत सामील होणार असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने आता महायुतीच्या जागावाटपाबरोबरच महाविकास आघाडीच्या जागावाटपाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारचे हेवेदावे नसल्याचा दावा केला जात असला तरी रखडलेल्या जागावाटपामागे बहुतांश पक्षनेते व कार्यकर्ते यांचे समाधान न होणे, हेच प्रमुख कारण आहे. आता महाविकास आघाडीने जागावाटप अंतिम करण्यासाठी आज, २१ मार्चचा मुहूर्त निवडला आहे. या बैठकीत अंतिम चर्चा केली जाणार असून, त्यानंतर जागावाटप जाहीर केले जाणार आहे. त्यामुळेच या जागावाटपात वंचित बहुजन आघाडीला किती जागा देण्यात येतात, याबाबतही तर्कविर्तक लढवले जात आहेत. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.
'शिवतीर्था'वरही बैठक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने ते महायुतीत सामील होणार असल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे गुरुवारी 'शिवतीर्थ' या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मनसेच्या राज्यभरातील नेतेमंडळींसह पक्षातील सर्व सरचिटणीसांना आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीसह पक्षाच्या गुढीपाडव्याचा मेळाव्याबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.'बारामती'साठी 'जोड-तोड' सुरू
- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांचे बंड थंड होण्याची शक्यता असून, अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होण्याची शक्यता आहे.- खडकवासला मतदारसंघात महायुतीची समन्वय बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.- माजी मंत्री विजय शिवतारे यांचा बंडाचा पवित्रा कायम असून, त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन संवाद साधला.शरद पवार-जानकर भेट
पुणे : माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे, वर्ध्याचे नीतेश कराळे यांनीही पवार यांच्या शिवाजीनगरमधील 'मोदीबाग' येथील निवासस्थानी पवार यांची भेट घेतली. हे सर्व जण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FuIiBJV
No comments:
Post a Comment