रायगड: जिल्ह्यात मुरुड परिसरातील खोल समुद्रात परराज्यातील १० बोटी आणि त्यावरील सुमारे १०९ खलाशांना ताब्यात घेतले आहे. कोस्टल कार्ड आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या बोटी परराज्यातून मासेमारीसाठी महाराष्ट्राच्या समुद्र हद्दीत येऊन एलईडी पद्धतीने बेकायदेशीर मच्छीमार करत होत्या. त्यांना समुद्रात पकडून आगरदांडा येथे आणण्यात आले होते. शासनाने एलईडी मासेमारीवर बंदी घातली असली तरी परराज्यातील मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी बोटी महाराष्ट्राच्या खोल समुद्रात एलईडी पद्धतीने मच्छीमारी करत आहेत. यामुळे स्थानिक पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रायगड जिल्ह्यात पारंपारिक आणि एलईडी मच्छीमारी असा संघर्ष टोकाला गेलेला आहे. काही आठवड्यांपूर्वीच मुरुड एकदरा येथील एका बोटीवरील मच्छीमार खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेले असता त्यांना परप्रांतीयांनी मारहाण केली होती. यामुळे मुरुड परिसरात असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर मुरुड पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे ठरवले होते. या दहा बोटी एलईडी पद्धतीने मासेमारी करत असल्याचे प्राथमिक समोर आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. बेकायदा मासेमारीमुळे सागरी जैवविविधतेचा समतोल बिघडत चालला असून यामुळे समुद्रातील काही प्रजाती नष्ट होत आहेत. परप्रांतीय मच्छीमारांना पकडून त्यांच्या बोटीवरून एलईडी लाइट्स, जाळे आदी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या असून रात्री उशिरापर्यंत जप्ती मुद्देमाल कारवाई सुरू होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/j9qoUAB
No comments:
Post a Comment