नवी दिल्ली: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवला होता. त्यानंतर टीम इंडियाने विशाखापट्टणम, राजकोट आणि रांची कसोटीत शानदार विजय साकारत मालिकेत ३-१ अशी आघाडी घेतली. आता दोन्ही संघातील अखेरची कसोटी ७ मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता नाही. मालिका झाल्यानंतर काही आठवड्यात आयपीएलचा हंगाम सुरू होणार आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर टी-२० वर्ल्डकप खेळायचा आहे. आयसीसीच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास पुढील १५ महिने भारतीय संघासाठी फार महत्त्वाचे असणार आहेत. या १५ महिन्यात ३ मोठ्या आयसीसी स्पर्धांचे आयोजन होणार आहे. टीम इंडियाची पहिली परीक्षा टी-२० वर्ल्डकपमध्ये होणारआहे. २०२४चा टी-२० वर्ल्डकप १ जून ते २९ जून या कालावधीत वेस्ट इंडिज आणि अमेरीकेत होणार आहे. या स्पर्धेत २० संघ असतील ज्यात नॉकआउटसह ३ टप्पे असतील. या स्पर्धेतील सर्व संघांना ४ गटात विभागण्यात आले आहे. ग्रुप ए मध्ये असेलल्या भारतासोबत आयरलँड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत. भारताच्या सुरुवातीच्या ३ लढती न्यूयॉर्कमध्ये होतील. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. भारताची पहिली मॅच ५ जून रोजी आयरलँडविरुद्ध होईल. दुसरी लढत ९ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध, तिसरी लढत १२ जून रोजी अमेरिकेविरुद्ध तर ग्रुप फेरीतील अखेरची लढत १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध होईल. भारतीय संघ सुपर ६ फेरीपर्यंत सहज पोहोचेल. त्यानंतर विजेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागले. आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होईल का याबाबत अद्याप निश्चिती नाही. यासाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार का की आशिया कप प्रमाणे ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने होईल याबाबत अद्याप काही निर्णय झाला नाही. भारताने दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे. आता त्याची नजर तिसऱ्या विजेतेपदावर असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जून २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. ही लढत इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम मॅच इंग्लंडमध्ये ठेवण्यात आली आहे. याआधी २०२१ आणि २०२३ची फायनल इंग्लंडमध्ये झाली होती. या दोन्ही अंतिम सामन्यात भारताने धडक मारली होती पण दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आता टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC फायनलमध्ये पोहोचते का हे पाहावे लागले. जर भारत फायनलमध्ये पोहोचला तर विजेतेपदाची संधी सोडता कामा नये. भारतीय संघाला गेल्या ११ वर्षात आयसीसीचे विजेतेपद मिळवता आले नाही. भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर आयसीसीच्या १० स्पर्धा झाल्या असून त्यापैकी भारताने ५ वेळा फायनल आणि ४ वेळा सेमीफायनल खेळली आहे. एक स्पर्धेत भारत ग्रुप फेरीतून बाहेर पडला होता.आयसीसी स्पर्धेत २०१३ नंतरची भारताची कामगिरी२०१४ टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभव २०१५ वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव २०१६ टी-२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पराभव २०१९ वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव २०२१ WTC फायनलमध्ये पराभव २०२१ टी-२० वर्ल्डकप ग्रुप फेरीतून बाहेर २०२२ टी-२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पराभव २०२३ WTC फायनलमध्ये पराभव २०२३ वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये पराभव
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Elq8Ofk
No comments:
Post a Comment