म. टा. प्रतिनिधी, पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार; तसेच पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे उद्या, गुरुवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरताना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणावरून दोन्ही बाजूने तोफा धडाडणार आहेत.बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. आता प्रचाराला वेग येत असताना गुरुवारी दोन्ही बाजूने अर्ज भरण्यात येणार आहे. या वेळी पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, शिरूर उमेदवार डॉ. कोल्हे हेही उमेदवारी अर्ज भरणार आहेत.पवारांच्या सभेकडे लक्षमहाविकास आघाडीच्या वतीने हॉटेल शांताईजवळ गुरुवारी सकाळी दहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील; तसेच आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके उपस्थित राहणार आहेत. या सभेत अजित पवारांसह महायुतीवर नेमकी कोणती टीका केली जाणार आहे, याकडे लक्ष लागून राहिले आहे. शक्तिप्रदर्शनातून आव्हान देणार?राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने दुपारी बारा वाजता हॉटेल ब्लू नाइलजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने अजित पवार यांच्या गटाकडूनही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत शरद पवारांच्या गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे पुण्यात गुरुवारी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात होणार आहे. नाती सुधारु शकतातपुणे :‘निवडणुकांचा काळ मर्यादित असतो. आरोप - प्रत्यारोप त्या काळातच होत असतात. मात्र, निवडणुकानंतर कुटुंबातील नातेसंबंध सुधारू शकतात,’ असा विश्वास बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.पुण्यात प्रचारादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या वेळी भाजपाचे माजी खासदार प्रदीप रावत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होत्या. ‘संपूर्ण बारामती मतदारसंघात सर्वत्र फिरत असताना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चांगल्या मताधिक्याने मी निवडून येईन,’ असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.‘भोर तालुक्यातील उत्रोली गावात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) मागणी केली आहे. पुरंदरमध्ये विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासारख्या विषयांचा पाठपुरावा करण्याचे माझा मनोदय आहे. गेल्या २५ वर्षात समाजकारणात आहे. बारामतीच्या विकासाचा पॅटर्न वेगळा असून संपूर्ण बारामती मतदारसंघात तो पॅटर्न राबविण्याचा मनोदय आहे,’ असेही त्या म्हणाल्या. ‘बाहेरच्या पवार’ म्हणून शरद पवार यांनी टीका केली त्याबाबत विचारता, ‘त्यावर आता काही बोलायचे नाही,’ असे सांगून बोलणे टाळले.‘राजकारणात कौटुंबिक नाते आणणे हे दुर्दैव आहे. संसदेत मी मतदारसंघाचे प्रश्न मांडू शकेन. मतदारांची भाषा मी जाणते. ही लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे होतीलच. जनतेतून माझ्या उमेदवारीची मागणी होत होती. जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे बारामती हेच माझे कुटुंब मी मानते,’ अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी भूमिका माडंली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FfJEhCN
No comments:
Post a Comment