वृत्तसंस्था, बारपेटा (आसाम) : काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा मुस्लिम लीगसारखा असल्याचा भाजपचा दावा फेटाळून लावून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘मोदींची खोटारडेपणाची फॅक्टरी’ कायम चालणार नाही, असे म्हटले आहे.आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील कायाकुची येथे एका प्रचार सभेत ते बोलत होते. ‘देशातील बेरोजगारी ही मोठी समस्या आहे आणि ६५ टक्के सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. इंडिया आघाडी नक्कीच सत्तेत येईल आणि भाजपला रोखेल. मोदींच्या भाजपचा नायनाट होईल. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर महागाईवर नियंत्रण ठेवू आणि आमचे लक्ष गरीब जनतेवर असेल. सरकारी विभागातील ३० लाख रिक्त पदे आम्ही भरणार आहोत,’ असे ते म्हणाले.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारड्यांचे सरदार आहेत,’ असा आरोप करून खर्गे म्हणाले, ‘दर वर्षी दोन कोटी नोकऱ्या देणे, काळा पैसा देशात आणणे आणि प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे अशी खोटी आश्वासने मोदींनी दिली. मोदींची खोटारडेपणाची फॅक्टरी कायम टिकणार नाही. त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुस्लिम लीगचा जाहीरनामा म्हटले आणि तेव्हाही खोटे बोलले.’‘भाजप देशाची संपत्ती लुटून श्रीमंतांच्या स्वाधीन करीत आहे. मोदींनी आपल्या काही श्रीमंत मित्रांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले,’ असा दावा खर्गे यांनी केला.‘पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’चे नेतृत्व केले, तर मोदी ‘भारत तोडो’चे काम करीत आहेत. सत्ता जाण्याच्या भीतीने घाबरलेले आणि थरथरणारे पंतप्रधान मोदी सातत्याने काँग्रेस आणि गांधी घराण्यावर हल्ले करीत आहेत. ज्याला गरिबांचे दु:ख जाणवत नाही, त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,’ असेही खर्गे म्हणाले.‘ते घटना बदलणारच’धरमपूर (गुजरात) : ‘आपण राज्यघटना बदल करणार नसल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते सांगत असले, तरी भाजप सत्तेत आल्यास ते नक्की राज्यघटना बदलतील,’ असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वद्रा यांनी केला.वलसाड जिल्ह्यातील आदिवासीबहुल धरमपूर गावात शनिवारी आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. वलसाड मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव असून, तिथून अनंत पटेल हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. महागाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करून प्रियांका यांनी त्यांनी ‘महंगाई मॅन’ म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या काळात व्यासपीठावर येताना ‘सुपरमॅन’सारखे येतात, मात्र त्यांना ‘महंगाई मॅन’ म्हणून ओळखले पाहिजे,’ असे प्रियांका म्हणाल्या. ‘गुजरात हे मोदींचे स्वत:चे राज्य आहे. तरीही येथील आदिवासी जनता महागाई, बेरोजगारी, कमी मोबदला, जमीन हिरावली जाणे, महिलांवरील हिंसाचार या समस्यांनी त्रस्त आहे,’ असा दावा प्रियांका यांनी केला.भाजपच आरक्षणाविरोधात : जयराम रमेशनवी दिल्ली : ‘काँग्रेस अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आहे आणि ती हिसकावून घेऊ इच्छित आहे, असा खोटा प्रचार पंतप्रधान वारंवार करीत आहेत,’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला. ‘मोदींचा आरोप पूर्णपणे खोटा आहे. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर काँग्रेस नेत्यांमुळे अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणासाठी राज्यघटनेत तरतुदी करण्यात आल्या, ही वस्तुस्थिती आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात भाजपच आहे,’ असा आरोप रमेश यांनी केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/FT7fKao
No comments:
Post a Comment