Breaking

Friday, April 26, 2024

मराठवाड्यात ५६ टक्के मतदान, ९० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, कुठे किती झालं मतदान? https://ift.tt/W1DohS7

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील घटनेचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. या तीन मतदारसंघांत मिळून सरासरी टक्के ५६ टक्के मतदान झाले. यात नांदेड लोकसभा मतदार संघात निर्धारित वेळेअखेर ५२.४७ टक्के, हिंगोलीत ६२.६७ टक्के, तर परभणी लोकसभा मतदारसंघात ५३.७९ टक्के मतदान झाले. प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवारांसह एकूण ९० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले असून, मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यासाठी ४ जूनपर्यंत मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे.नांदेड मतदारसंघनांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सहाही विधानसभा मतदार संघात दोन हजार ६२ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता. काही ठिकाणी सकाळी साडेसहापासून मतदानासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या वर्षी शहरातील वजिराबाद भागातील गुजराथी हायस्‍कूल येथे महिला सखी केंद्रात मतदारांचे गुलाबपुष्‍प देऊन स्‍वागत करण्‍यात आले. जिल्‍ह्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम घेण्‍यात आला. सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्‍के मतदान झाले होते. जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकुटूंब आयटीआय परिसरातील कामगार कल्‍याण केंद्रावर मतदानाचा हक्‍क बजावला. शुक्रवारी विवाह मुहूर्तही होता, अनेक जोडप्‍यांनी वि‍वाह विधी पूर्ण करण्‍यापूर्वी प्रथम राष्‍ट्रीय कर्तव्‍याला प्राधान्‍य देऊन, मतदान पूर्ण करून मगच विवाह सोहळयाचा विधी पूर्ण केल्याचे दिसून आले.हिंगोली मतदारसंघहिंगोली मतदारसंघातील ३३ उमेदवारांचे भवितव्य मतदारयंत्रात शुक्रवारी बंद झाले. मतदानासाठी मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा होत्या. उन्हाचा कडाका असतानादेखील हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वच मतदान केंद्रावर गर्दी होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२.३ टक्के मतदान झाले होते. उन्हाची तीव्रता कमी होत असतानाच मतदानासाठी अनेक केंद्रावर रांगा होत्या. उमेदवारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे बाबुराव कदम कोहळीकर, ‘वंचित’चे डॉ. बी. डी. चव्हाण आदींसह ३३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. उमेदवारांकडून आपापल्या विजयाचा दावा केला जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी यंत्रात तांत्रिक बिघाड आल्याने मतदान यंत्र बदलण्याची वेळ प्रशासनावर आली.परभणी मतदारसंघपरभणी लोकसभा मतदार संघातील ३४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. २,२९० मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. रखरखते ऊन, शहरी भागांत मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांची होणारी धावपळ, एकाच कुटुंबातील मतदारांचे फाटाफूट, सुशिक्षित मतदारांची उदासनिता, लग्नसराई आदींचा मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसले. ग्रामीण भागात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारसंघात सायंकाळी पाचवाजेपर्यंत सरासरी ५३.७९ टक्के मतदान झाले. प्रमुख राजकीय पक्ष आणि अपक्षांसह एकूण ३४ उमेदवारांचे भवितव्य यंत्र बंद झाले आहे. दरम्यान, काही मतदान केंद्रावर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. दरम्यान, परभणी तालुक्यातील बलसा गावाच्या परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवावा, यासाठी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सकाळपासूनच एकही मतदार मतदान केंद्राकडे फिरकला नाही. दरम्यान, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन चर्चा केल्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला. दरम्यान, महायुतीचे उमेदवार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान नव्हते. महविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी परभणी येथील शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा अधिकार बजावला. या वेळी नवमतदार असलेल्या त्यांच्या कन्येने पहिल्यांदाच मतदान केले. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनी परभणीत मतदान केले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी पत्नी ॲड. माधुरी क्षीरसागर यांच्यासह परभणीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.‌ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डख यांनीही मतदान केले.नांदेड जिल्ह्यात ‘ईव्हीएम’ फोडलेछत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एक व्यक्तीने मतदान यंत्राची (ईव्हीएम) तोडफोड केली. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. या यंत्रातील सर्व डेटा सुरक्षित असून, यंत्र बदलून पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली, अशी माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासून सुरळीत मतदान सुरू झाले. सायंकाळी चारच्या सुमारास रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रावर भैयासाहेब नावाच्या मतदाराने कुऱ्हाडीच्या तुंब्याने यंत्रावर प्रहार केला. यामध्ये बॅलेट युनिटचे नुकसान झाले. कंट्रोल युनिट आणि सर्व डेटा सुरक्षित आहे. यंत्र बदलून पुन्हा पुढील मतदान प्रक्रिया सुरू केली गेली. संबंधित व्यक्तीवर पोलिस कायदेशीर कारवाई करीत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/yOxUBji

No comments:

Post a Comment