Breaking

Wednesday, May 15, 2024

Fact Check : बीड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून आयपीएस प्रविण मुंडे यांची बदली? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागचं सत्य https://ift.tt/nXL3fSQ

बीड : बीड जिल्ह्यात दिवसभरात पोलीस अधीक्षक म्हणून आयपीएस प्रविण मुंडे यांची बदली झाल्याच्या पोस्ट सोशल मीडिया व्हायरल करण्यात आल्या. काही क्षणात ही बातमी प्रचंड परसली आणि बीडमध्ये आधीच जिल्हाधिकारी मुंडे आहेत आणि आता एसपीही मुंडे येणार का? ही उत्सुकता निर्माण झाली. बातमी व्हायरल झाल्यानंतर ही बातमी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी आम्ही प्रविण मुंडे यांच्याशी संपर्क केला आणि थेट सत्य जाणून घेतलं. माझी कुठेही बदली झाली नसून मी मुंबईत आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी बोलताना दिलं. तरीही सोशल मीडियावर त्यांच्या बदलीच्या आणि बीड जिल्ह्यात त्यांचं स्वागत झाल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या.

अचानक प्रविण मुंडेंच्याच नावाची चर्चा कशामुळे?

बीडच्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान टोकाचा जातीयवाद झाला आणि अधिकाऱ्यांच्या जातीची यादीही व्हायरल करण्यात आली. बीडचे राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्यावरही अप्रत्यक्ष आरोप केले. पण मतदान पार पडल्यानंतर कोणीतरी खोडसाळपणा करत आणखी एक मुंडे अधिकारी येणारी असल्याची बातमी व्हायरल केली. जिल्ह्यातील पोलीस दलात पोलीस अधीक्षक हे सर्वात मोठं पद आहे आणि या पदावर प्रवीण मुंडे येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली.

कोण आहेत प्रविण मुंडे?

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आहेत. ते २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्यात पोलीस अधिक्षक म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली आहे. करोना काळात रत्नागिरीमध्ये त्यांच्या कामाची प्रचंड चर्चा झाली. रत्नागिरीनंतर प्रविण मुंडे यांची जळगावला बदली झाली. त्यानंतर जळगावमध्येही चोख काम करत अनेक अवैध धंदे त्यांनी बंद पाडले आणि त्याचं नाव गाजलं. प्रविण मुंडे सध्या मुंबईत झोन १ चे पोलीस उपायुक्त आहेत. मुंबईतील सर्वात व्हिआयपी परिसर मरीन लाइन्स, मंत्रालय, वानखेडे स्टेडियम यासारखा व्हिआयपी परिसर प्रविण मुंडे यांच्या अखत्यारित येतो.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kNxJGPr

No comments:

Post a Comment