शुभम बोडखे, नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकजवळ उत्तर महाराष्ट्र केसरीची हत्या करण्यात आली आहे. भूषण लहामगे असं या उत्तर महाराष्ट्र केसरीचे नाव आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ भूषण लहामागेच्या हत्येचा थरार घडला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडत त्याची हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नाशिक शहर खुनाच्या घटनेने सर्वाधिक चर्चेत राहिले आहे. आज देखील नाशिक येथी मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास कुस्तीपटू गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मारेकरी दुचाकीवरून येऊन गोळ्या झाडून आणि एकाने कोयत्याने वार करून ही हत्या केल्याची घटना प्रत्यक्ष दर्शनी झाल्याच्या सांगितले आहे. कुस्तीपटू भूषण लहामगेची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर धारधार शस्त्राने वार केला. यात भुषणचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यातच भूषण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना आज शुक्रवारी (दि.१०) दुपारी चार वाजेच्या सुमारास नाशिक-इगतपुरी महामार्गावरील विल्होळीनजीक राजूर फाटा येथे पंजाबी डाब्याजवळ घडली. ऐन अक्षय्य तृतीयेच्या दिवशीच हत्या झाल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूषण याची हत्या मागील भांडणाची कुरापत काढून झाली, असावी अशी देखील माहिती प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मारेकरी दुचाकीवर आले. तर दोन मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसले होते. ही घटना घडली त्यावेळी मारेकऱ्यांनी भुषणला रस्त्यात अडवून पहिले त्याच्या पाठीवर दोन गोळ्या फायर केल्या. नंतर धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्यात भूषण गंभीर जखमी झाला. मात्र काही वेळाने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. भूषण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. भूषणची हत्या करून आरोपींनी तेथून इगतपुरीच्या दिशेने पळ काढला. हत्या का आणि कशामुळे झाली? याचे कारण समजू शकले नाही. भुषण हा इगतपुरी तालुक्यात कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होता. तो शेती तसेच दुधाचा व्यवसाय करीत होता. मात्र ही हत्या मागील भांडणाची कुरापत काढून झाली असावी, असा देखील अंदाज लावला जातो आहे. भूषण हा घरी असलेल्या म्हशींसाठी चक्कीतले पीठ घेऊन तो आपल्या गावी सांजेगाव येथे जात होता. आज सकाळपासून तो नाशिकमध्ये आला होता. काही बाजार करून आणि शहरातील सिडको येथील चक्कीतून म्हशींना पीठ घेऊन तो दुचाकीने जात होता. त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या संशयितांनी त्याचा रस्ता अडवून त्याची हत्या केली. त्यामुळे पंचक्रोशीत भूषणच्या हत्येने शोककळा पसरले आहेत. कुस्तीपटू असलेल्या भुषणने जिल्हा, विभाग स्तरावर कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविले होते. मात्र ही घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिकांनी वाढीवरे पोलिसांना घटनेची माहिती दिली. वाडीवऱ्हे अन् ग्रामीण पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी पंचनामा करून भुषणचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवला. तेथे त्यावर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी भुषणचे नातेवाईक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही हत्या नेमकी कशामुळे झाली या संदर्भात ग्रामीण पोलीस आता तपास करत आहेत. भूषणची हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता भूषणच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. ही घटना घडल्यामुळे नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या ही हत्या झाल्यामुळे आता अट्टल आरोपींवर पोलिसांचा धाक उरला नसल्याच देखील समोर येत आहे. भूषणचा हत्येचा कट रचून त्याची हत्या करण्याची घटना घडल्यामुळे हा संपूर्ण घटनाक्रम सिनेस्टाईल पद्धतीने झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या खून प्रकरणात पोलीस नेमके कशा पद्धतीने तपास करून या मारेकऱ्यांना ताब्यात घेणार हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Lkixyd4
No comments:
Post a Comment