Breaking

Friday, May 17, 2024

भाजपने आमच्या पक्षातील घाण साफ केली, सगळा कचरा सोबत नेला; उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींसह भाजपला लक्ष्य https://ift.tt/OmLVa2F

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईबीकेसी येथील मैदानात शुक्रवारी झालेल्या महाआघाडीच्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला लक्ष्य केले. ‘आमच्या पक्षातील घाण भाजपने साफ केली, सगळा कचरा त्यांनी सोबत नेला. भाजप हा भेकड आणि भाकडांचा पक्ष आहे. ती एक कचरागाडीच झाली आहे’, अशी जळजळीत टीका ठाकरे यांनी यावेळी केली.‘तुम्ही आमचे चिन्ह, नेते सर्व काही चोरले. तरीही मी उभा आहे. तुम्ही कोणत्या घराण्याचे माहित नाही, पण माझे घराणे जन्माला आले त्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्मले. तुम्ही जिथे जन्मलात तिथे औरंगजेब जन्माला आला. मी माझ्या सात पिढ्यांचे कर्तृत्व सांगू शकेन, पण तुम्ही ते सांगू शकता का,’ असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘मराठा साम्राज्य गाडण्यासाठी औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून होता, परंतु या मातीतील वीरांनी त्याला इथेच गाडून टाकले. मी आव्हान देतो की, या उद्धव ठाकरेला तुम्ही संपवून दाखवा, माझा महाराष्ट्र तुम्हाला याच मातीत गाडेल,’ असा हल्लाबोलही त्यांनी केला. ‘मोदी यांनी नोटाबंदी केली, त्यावेळी म्हटले की, संबंधित चलनी नोटा आता फक्त कागदाचे तुकडे राहतील. तसेच ४ जूनला ही जनता डिमोदीनेशन करणार आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, तर केवळ नरेंद्र मोदी राहतील,’ असा टोला त्यांनी लगावला. ‘हे राज्य शाहु-फुले-आंबेडकरांचे असून त्याला शहा-मोदी-अदानीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. ‘मोदी यांच्या रोड शोवरूनही ठाकरे यांनी त्यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वीच शहरात होर्डिंग कोसळून नागरिक मृत्यूमुखी पडले, पण त्याच परिसरात तुम्ही फुले उधळत, ढोल-ताशे बडवत रोड शो केला,’ अशी टीका ठाकरे यांनी केली.

मराठी विरोधक ‘गेट आऊट’

मुंबईत अनेक पिढ्यांपासून गुजराती गुण्यागोविंदाने राहत असून त्यांचा या शहराच्या आणि राज्याच्या विकासात हातभार आहे. परंतु, जर काही गुजराती उद्योग आणि उद्योजक नरेंद्र मोदी यांच्या नादाला लागून मराठी माणसाला रोजगार नाकारणार असतील, तर अशा सर्वांना मी ‘गेट आऊट’ म्हणतो, असे ठाकरे यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ujrcwP9

No comments:

Post a Comment