महेश पाटील, नंदुरबार: मागील काही महिन्यात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहे, अशी चर्चा आपल्याला ऐकायला मिळाली. परंतु आता महाराष्ट्रातील महिलांना थेट गुजरातमधून पाणी आणावे लागत आहे. कदाचित आपला विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे. तीव्र उन्हामुळे सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असून अनेक ठिकाणी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गुजरात सीमेवर राहणाऱ्या नंदुरबार येथील महिला थेट गुजरात राज्यातून पायपीट करत पाणी आणत असल्याने महाराष्ट्रातील सरकार करतंय काय? असाच प्रश्न आता या महिलांमधून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यासह नवापूर तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली असुन पाण्याची पातळी खालावली आहे. नवापूर शहरातील नगरपालिका हद्दीतील तिनटेंबा भागातील आमलीफळी भागात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या भागात पालिकेने पाण्याची टाकी बसवली आहे, तरी या भागात नियमीत पाणी येत नाही. या भागात मागील ३ महिन्यापासून पाण्याची समस्या आहे. महिलांना जवळच गुजरात राज्यातील पाड्यावरून २ किलोमीटर पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे. या भागात नवापूर पालिकेने टँकर सुरू केले होते. मात्र आठ दिवसांपासून टँकर ही बंद असल्याने संतप्त झालेल्या महिला नवापूर नगरपालिका कार्यालयात ठिय्या मांडला. परंतु मुख्यधिकारी रजेवर गेल्यामुळे महिलांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर संतप्त महिलांनी हंडा डोक्यावर घेत आपला मोर्चा तहसिल कार्यालयावर वळविला. तहसील कार्यालयात तहसिलदार प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले. या प्रसंगी तहसिलदार कुलकर्णी यांनी प्रभारी मुख्यधिकारी नितिन कापडणीस यांना मोबाइलवरून आमलीफळी भागातील पाण्या संदर्भातील समस्या दूर करण्याचे आदेश दिले. पाच दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास मोठे आंदोलन उभारण्याच्या इशारा नागरिकांनी दिला आहे. आता पालिका अधिकारी तहसीलदारांच्या आदेशाला गांभीर्याने घेणार का? महिलांची पायपीट थांबणार का? जनतेसाठी पाणीपुरवठा केला जाणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून तापी आणि नर्मदा या मोठ्या नद्या आहेत. नर्मदा नदीवर गुजरात राज्यात सरदार सरोवर धरण बांधण्यात आले आहे. तर तापी नदीचे पाणी सोनगड येथील धरणात साठवण्यात येते. जिल्ह्यात या मोठ्या नद्यांचा फायदा गुजरातला मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात दोन नद्या असल्या तरी जिल्हा मात्र कोरडा असल्याची स्थिती दिसत आहे. याबाबत राज्य शासन उदासीन असल्याचे दिसून येते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/AoDb48s
No comments:
Post a Comment