म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील मतदानासाठी अवघे सहा दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहेत. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचार करतानाच महायुतीचे उमेदवार आणि महाविकास आघाडी उमेदवार यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आधी विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे उमेदवार आता हे मुद्दे सोडून गुद्द्यावर आले आहेत. त्यामुळे विकासाचे मुद्दे भरकटले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठी विरुद्ध गुजराती, डम्पिंग ग्राउंड, मानखुर्द-शिवाजी नगर ड्रग्समुक्त, मुलुंडमध्ये धारावी पुनर्वसन आदी मुद्द्यावरून सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
मराठी-गुजराती वाद
घाटकोपर पश्चिममधील समर्पण नामक एका गुजरातीबहुल सोसायटीतील रहिवाशांनी भाजपचे स्थानिक पदाधिकारी असून त्यांनाच मत देऊ, असे स्पष्ट सांगून शिवसेना (उबाठा गट) कार्यकर्त्यांना सोसायटीत प्रचारपत्रक वाटण्यास मनाई केली. यावरून महाविकास आघाडी उमेदवार संजय पाटील यांनी या मतदारसंघात मराठी विरुद्ध गुजराती असा वाद भाजपकडून निर्माण केला जात आहे. दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असा प्रचार केला जात असल्याची तक्रार त्यांनी निवडणूक आयुक्त आणि मुंबई पोलिस आयुक्तांना देऊन कारवाईची मागणी केली. तर माझे विरोधकच मराठी-गुजरातीला निवडणुकीचा मुद्दा बनवत असल्याचे सांगून त्यांना विकासावर बोलायचे नसल्याचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांकडे व्हिजन नसल्यानेच ते भाषा आणि हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत असल्याचे सांगून पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत.प्रचारयात्रेवरून वादाला सुरुवात
महायुतीचे उमेदवार कोटेचा यांची मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये प्रचारयात्रा सुरू असतानाच दगडफेक करण्यात आली होती. यावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांच्या गुंडांनी प्रचाररथावर दगडफेक करून नुकसान पोहोचवल्याचा आरोप केला. पराभव दिसत असल्यानेच हल्ला केल्याचेही कोटेचा यांनी सांगून हिंमत असेल तर समोरून वार करण्याचे आव्हान दिले. मात्र आरोप फेटाळून लावत सरकार तुमचेच असून पोलिस बंदोबस्तात घेऊन प्रचार करा, असा सल्ला पाटील यांनी कोटेचा यांना दिला होता. तसेच गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द ड्रग्सचा अड्डा झाला असून हा परिसर ड्रग्समुक्त करणार असल्याचेही कोटेचा यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. मात्र गेल्या दहा वर्षांत या भागांत का कारवाई झाली नाही, असा प्रश्न पाटील यांनी विचारला होता.धारावी पुनर्वसन प्रकल्प
मुलुंडमध्ये धारावी विस्थापितांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही या लोकसभा निवडणुकीत चर्चेत आला. कुठल्याही परिस्थित धारावीकरांचे पुर्नवसन करू दिले जाणार नाही. धारावीमध्येच त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन देत महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांनी भाजपच्या एकाही नेत्याने या प्रकल्पाला विरोध केला नसल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी मुलुंडमध्ये स्थानिकांमध्ये प्रचार करताना धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मुलुंडकरांचा विरोध असतानाही भाजपचा एकही नेता या आंदोलनात सहभागी झाला नसल्याचा आरोपही झाला. त्यानंतर महाविकास आघाडी उमेदवार कोटेचा यांनीही, धारावी पुनर्विकास अधिकाऱ्यांनी जी जमीन मागितली होती ती मुलुंड डम्पिंग ग्राऊंडची होती. पुढील सहा वर्षे या डम्पिंग ग्राऊंडवर प्रक्रिया केली जाणार असल्याने कोणताही विकास प्रकल्प राबवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.मुलुंडमधील विकासाचा वाद
मुलुंडमध्ये भाजपची ताकद असतानाही एक क्रिडा संकुल व सर्व सुविधांनी सुसज्ज असे रुग्णालय का बांधले नाही. क्रिडा संकुलाचे भूमिपूजन दोन वेळा करण्यात आले. मात्र भाजपला एकही विट रचता आलेली नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच पीएपी प्रकल्पावरून भाजप गप्प असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र पाटील यांनी काय विकास केला आणि त्यांनी विकासासाठी काय कार्यकल्पना मांडली, याची माहिती देण्यासाठी समोरासमोर यावे, असे आव्हानही समाजमाध्यमाद्वारे कोटेचा यांनी दिले आहे. मुलुंडमधील पीएपी प्रकल्पाबाबत विरोधक पहिल्या दिवसांपासून विविध आरोप करत असून पीएपी प्रकल्पासाठी मुलुंडमध्ये एकही जमीन देण्यात आली नसल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले.डंपिंग ग्राऊंड आरोप-प्रत्यारोप
भांडुप, नाहूर, कांजुरमार्ग, विक्रोळीकरांना शिवसेनेने डम्पिंग ग्राऊंड भेट दिले आणि येथील स्थानिकांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप कोटेचा हे प्रचारफेरी आणि सभांमधून वारंवार करत आहेत. शिवसेनेने येथील मराठी बांधवांच्या आरोग्याचा विचार का केला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला होता. मात्र या डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न तत्कालिन खासदार मनोज कोटक यांना सोडवता आला नसल्याची प्रतिक्रिया नुकतीच मुलुंडकरांनी व्यक्त केल्याचे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून स्पष्ट केले होते. खासदार होताच डम्पिंगचा प्रश्न सोडवला जाईल, असे उत्तर त्यांनी यावर दिले होते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bCf16up
No comments:
Post a Comment