Breaking

Sunday, May 12, 2024

आरसीबी दणदणीत विजयासह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीला धुळ चारत जिंकला सामना https://ift.tt/CwtZA2z

बेंगळुरु : दिल्लीच्या संघावर दणदणीत विजय साकारत आरसीबीच्या संघाने प्ले ऑफच्या शर्यतीमधील आपले आव्हान अजूनही जीवंत ठेवले आहे. रजत पाटीदारच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १८७ धावांचा डोंगर उभारला होता. आरसीबीच्या १८८ धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीचा संघ उतरला खरा, पण त्यांना आरसीबीच्या गोलंदाजांनी जास्त काळ टिकू दिले नाही. अचूक आणि भेदक मारा करत आरसीबीच्या गोलंदाजांनी विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. अक्षर पटेलने यावेळी एकाकी झुंज दिली खरी, पण त्याला दिल्लीच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. अक्षर पटेल ५७ धावांवर बाद झाला आणि आरसीबीचा विजय सुकर झाला. आरसीबीने दिल्लीवर ४७ धावांनी विजय साकारला.दिल्लीच्या संघाला आरसीबीने पहिल्याच षटकात डेव्हि वॉर्नरच्या रुपात मोठा धक्का दिला. वॉर्नरला यावेळी फक्त एकच धाव करता आली. त्यानंतर आरसीबीने अभिषेक पोरेलला २ धावांवर बाद केले आणि दिल्लीला दुसरा धक्का दिला. एकामागून एक दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यामुळे त्यांचा डाव अडचणीत आला होता. पण यावेळी हंगामी कर्णधार अक्षर पटेलने संघाला सावरले. अक्षरने यावेळी कर्णधाराला साजेसे अर्धशतक साकारले आणि दिल्लीच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे अक्षर पटेलची विकेट ही आरसीबीसाठी महत्वाची होती. अक्षर पटेलला यश दयालने बाद केले आणि तिथेच हा सामना आरसीबीच्या बाजूने झुकला. अक्षर पटलने ३९ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची एकाहकी झुंज साकारली, पण ती अखेर व्यर्थ ठरली.आरसीबीला फॅफ ड्यु प्लेसिसच्या रुपातत पहिला धक्का बसला. पण त्यानंतर विराट कोहलीने फटकेबाजी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. विराट या सामन्यातही मोठी खेळी साकारेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण विराटला इशांत शर्माने बाद केले आणि आरसीबीला मोठा धक्का दिला. विराटला यावेळी २७ धावा करता आल्या. पण त्यानंतर रजत पाटीदारने ३२ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५२ धावांची दमदार खेळी साकारली. रजतला यावेळी विल जॅक्सने ४१ धावांची खेळी साकारत चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर संघाची धावगती वाढवण्यासाठी पुढे आला तो कॅमेरून ग्रीन. यावेळी ग्रीनने २४ चेंडूंत नाहाद ३२ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळे संघाला १८७ धावांचा पल्ला गाठता आला.दिल्लीच्या संघाकडून यावेळी इशांत शर्माने विराट कोहलीला बाद करत संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर खलील अहमद आणि रासिख सलाम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. पण यावेळी त्यांना आरसीबीच्या धावसंख्येला वेसण घालता आली नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CzHAtgT

No comments:

Post a Comment