म. टा. विशेष प्रतिनिधी,नाशिक : नाशिक लोकसभेसाठी यंदा मतदानाने ६० टक्क्यांचा आकडा पार केला असला तरी, भाजपचा गड अशी ओळख असलेल्या नाशिक पूर्व या मतदारसंघात मात्र किंचीत वाढ नोंदवली गेली आहे. त्यामुळे मतदानातील ०.२५ टक्के वाढ महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना तारणार की, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंना साथ देणार याची आता चर्चा सुरू झाली आहे. भाजपला गुजराती आणि ओबीसी समाजाकडून आस असली तरी, मराठा समाजातील मतांचे विभाजन आणि दलित मते कोणाकडे झुकतात, यावरच या मतदारसंघातील विधानसभेची गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे गोडसेंचे मताधिक्य घटते की, वाजे गोडसेंच्या मतांची बरोबरी करतात, याकडे लक्ष लागून आहे.नाशिक पूर्व मतदारसंघ हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपचे अॅड. राहुल ढिकले आमदार असल्याने महायुतीच्या उमेदवारांसाठी हा मतदारसंघ सर्वाधिक मताधिक्य देणारा ठरेल अशी अपेक्षा होती. मखमलाबाद, पंचवटी, तपोवन, जेलरोड, नाशिकरोड असा या मतदारसंघाचा विस्तार आहे. दर १२ वर्षांनी या भागात कुंभमेळा भरत असल्याने याला विशेष महत्व आहे. साधू-महंतांचे वास्तव्य आणि गोदावरी नदीच्या काठावरील या मतदारसंघात नाशिकमध्ये सर्वाधिक पर्यटक येतात. सन २००९ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. शहरी आणि ग्रामीण असे या मतदारसंघाचे मिश्रण असून, मराठा, दलित, गुजराती, ओबीसी या समाजाचे या मतदारसंघात प्राबल्य आहे. सन २००९ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून अॅड. उत्तमराव ढिकलेंनी बाजी मारली होती. त्यानंतर सन २०१४ मध्ये भाजपच्या बाळासाहेब सानप यांनी हा मतदारसंघ भाजपकडे आणला. त्यानंतर सन २०१९ मध्ये अॅड. उत्तमराव ढिकलेंचे पुत्र अॅड. राहुल ढिकले यांनी भाजपकडून उमेदवारी करीत, हा मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात ठेवला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधून येथे भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना विजयाचे लीड मिळते. त्यामुळे या मतदारसंघावर यंदाही महायुतीची मदार आहे. सन २०१९ मध्ये हेमंत गोडसे यांना या मतदारसंघातून तब्बल ७५ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. वंचितच्या पवन पवार यांनीही गेल्या वेळी २३ हजार मते मिळवली होती. त्यामुळे यंदा या मतदारंसघात गोडसेंना किती मताधिक्य मिळते, यावरच त्यांचे विजयाचे गणित अवलंबून आहे.भाजपची ताकद, तरीही निरुत्साह!सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ५५.१३ टक्के मतदान झाले होते. परंतु, यंदा त्यात पाव टक्का वाढ होत ५५.३८ टक्के झाले. यंदाच्या लोकसभेत शहरी विरुद्ध अशी ग्रामीण अशी सरळ लढत होती. राजाभाऊ वाजे सिन्नरमधून असल्याने त्यांना ग्रामीणमधून आघाडी मिळणार, हे निश्चित होते. त्यामुळे गोडसेंची संपूर्ण मदार शहरावरच अवलंबून होती. परिणामी, नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणे अपेक्षित होते. परंतु, मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. भाजपचे सर्वाधिक ३० पेक्षा अधिक माजी नगरसेवक या मतदारसंघात आहेत. अॅड. राहुल ढिकले यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मात्र त्यात फारसा रस दिसून आला नाही. ...तर भाजपला धोकागेल्या लोकसभेवेळी हेमंत गोडसे यांना या मतदारसंघातून एक लाख १७ हजार मते मिळाली होती. तर, समीर भुजबळांना अवघी ४० हजार मते मिळाली होती. गेल्या विधानसभेतही अॅड. राहुल ढिकले आणि बाळासाहेब सानप यांच्यात अवघे १२ हजार मतांचे अंतर होते. त्यामुळे यंदा या मतदारसंघात गोडसे यांचे मताधिक्य घटले किंवा वाजे आणि गोडसेंना समसमान मते मिळाली, तर भाजपला या मतदारसंघात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तूर्तास या ठिकाणी भाजपच्या अॅड. ढिकलेंसमोर तगडा उमेदवार दिसत नसला तरी, लोकसभेसारखीच महाविकास आघाडीने ताकद उभी केली तर मात्र भाजपला विजयासाठी शक्ती पणाला लावावी लागणार आहे.नाशिक पूर्वमधील लोकसभा मतदान टक्केवारी२०१४ - ४७.१४२०१९- ५५.१३२०२४ - ५५.३८
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/E1uKkqL
No comments:
Post a Comment