Breaking

Saturday, May 18, 2024

Weather Update: मुंबईसह राज्यात तीव्र काहिली; उद्यापर्यंत स्थिती कायम राहण्याचा अंदाज, काय काळजी घ्याल? https://ift.tt/qlIo0P8

मुंबई : शहरात उष्णतेमुळे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली काहिली सोमवारीही कायम राहण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत उष्मा आणि आर्द्रतायुक्त वातावरण असेल, असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत शनिवारी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या आत होता. मात्र, आर्द्रतेमुळे आणि सुर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत असल्याने वातावरणातील उष्म्याचा त्रास मुंबईकरांना झाला. रविवार आणि सोमवारीही हीच स्थिती कायम असू शकेल. सोमवारी मुंबईतील काही ठिकाणी कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.सांताक्रूझ येथे शनिवारी ३४.९, तर कुलाबा येथे ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा १.२ अंशांनी अधिक होते. तर आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्क्यांच्या आसपास होते. कुलाबा येथे ७५ टक्क्यांहून अधिक आर्द्रता होती. पारा चढा असताना आर्द्रतायुक्त वातावरणामुळे मुंबईकरांना उष्णता अधिक जाणवत होती. वाढलेल्या आर्द्रतेमुळे मुंबईचे किमान तापमानही शनिवारी चढे होते. सांताक्रूझ येथे २९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे २८.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सन २०२२ मध्ये मे महिन्यातील सर्वाधिक किमान तापमान २९.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते, तर सन २०१५ मध्ये २९.७ अंश सेल्सिअस हे मे महिन्यातील सांताक्रूझ येथील सर्वाधिक किमान तापमान होते. मुंबईत शुक्रवारी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मध्येच होणाऱ्या शिडकाव्यानंतर उकाड्याची जाणीव वाढत असल्याचे मुंबईकरांचे निरीक्षण आहे.सोमवारी मतदान होणाऱ्या जिल्ह्यांपैकी पालघरमधील डहाणू केंद्रावर शनिवारी ३७ अंश सेल्सिअस, तर नाशिक शहर येथे ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. डहाणू येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा २.८ अंश सेल्सिअसने अधिक होते. या वातावरणामुळे थकवा, अधिक तहान लागणे, घामामुळे अस्वस्थतेची जाणीव होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.सोमवारी वातावरण कसे असेल?भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये सोमवारी काही ठिकाणी ३८ अंशांपर्यंत तापमान चढू शकेल, तर ठाणे जिल्ह्यात ४० ते ४१ अंशांपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे. नाशिक येथे ४१, दिंडोरी येथे ४२ तर धुळे ४४ अंशांपर्यंत तापमानाचा पारा चढू शकेल, असा अंदाज आहे. या मतदारसंघांमध्ये किमान तापमानाचा पाराही २७ ते ३० अंशांदरम्यान असू शकेल. उत्तर मुंबईत ३५ ते ३७, उत्तर पश्चिम मुंबईत ३४ ते ३६, उत्तर पूर्व मुंबईत ३६ ते ३८, उत्तर मध्य मुंबईत ३४ ते ३६, दक्षिण मध्य मुंबईत ३५ ते ३७, दक्षिण मुंबईत ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान कमाल तापमान असू शकेल. पालघर येथे ३५ ते ३७, भिवंडी येथे ३९ ते ४१, कल्याण येथे ३९ ते ४१, ठाणे येथे ३८ ते ४० दरम्यान कमाल तापमानाची शक्यता आहे. काय काळजी घ्याल?-थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे-पुरेसे पाणी प्यावे-तहान लागली नसेल तरी पाणी प्यावे-हलक्या रंगाचे, सुती, सैल कपडे परिधान करावेत-भर दुपारी बाहेर फिरताना डोक्यावर ओला कपडा, छत्री, टोपी घालावी-चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळणे, अतिघाम ही लक्षणे उष्माघाताची असू शकतात. त्यानुसार वैद्यकीय मदत घ्यावी.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/p09CyHR

No comments:

Post a Comment