Breaking

Sunday, June 30, 2024

विदर्भात ४८ तासांत पाच शेतकरी आत्महत्या, कृषिदिनाच्या पूर्वसंध्येला धक्कादायक माहिती उघड https://ift.tt/se4gGyM

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : मागील ४८ तासांत नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या विदर्भातील पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. यंदा जूनपर्यंत पश्चिम विदर्भात ६९४ तर पूर्व विदर्भात २२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कृषिदिनाच्या पूर्वसंध्येला यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे.भंडारा जिल्ह्यातील दाभेविरली येथील विनोद ढोरे, चंद्रपूर जिल्ह्यातील चोरटीचे भोजराज राऊत व रणमोचनचे नीलकंठ प्रधान, यवतमाळ जिल्ह्यातील गांधीनगरचे बन्सी पवार आणि गगनमाळचे दादाराव बोबडे यांचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समावेश आहे. मागील वर्षीची नापिकी, सरकारी मदतीपासून वंचित आणि बँकांनी पीककर्ज वाटप रोखल्याने या आत्महत्या वाढल्या आहेत. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने २०१५ ते २०२१दरम्यान शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक कार्यक्रम सादर केला होता. केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने शेतकरी आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

पीककर्ज वाटप फक्त ५० टक्के

विदर्भात नापिकीचे संकट असतानाही कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. बिकट परिस्थिती असताना दुष्काळ घोषित केला गेला नाही. पीकविमा आणि कर्ममाफी मिळाली नाही. ३० जूनपर्यंत केवळ ५० टक्के पीककर्ज वाटप झाले. परिणामी पश्चिमपाठोपाठ पूर्व विदर्भातही शेतकरी आत्महत्या वाढल्याचा दावा तिवारी यांनी केला आहे.

अमरावतीत दिवसाला एक घटना

यवतमाळ जिल्ह्यात आजवर सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होत होती. मागील तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. यंदा मे महिन्यापर्यंत १४३ घटनांची नोंद झाली आहे. पाच महिन्यांत १५४ दिवसांचा विचार करता या जिल्ह्यात दररोज एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत १३२ शेतकरी आत्महत्या झाल्या असून ही राज्य सरकारचीच आकडेवारी आहे. २००१पासून अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात २२ हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचेही तिवारी यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LV1XxhB

No comments:

Post a Comment