Breaking

Wednesday, June 5, 2024

पराभूत झालेल्या लेकीला वडिलांचं पत्र; पराभव एक संधी म्हणून पाहण्याचा सल्ला, गावितांच्या भावनिक पत्राची जिल्ह्यात चर्चा https://ift.tt/yzJfb6Q

महेश पाटील, नंदुरबार: नंदुरबार लोकसभेत दोन वेळेच्या खासदार असलेल्या भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा पराभव झाला. यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सोशल मीडियावर त्याची कन्या डॉ. हिना गावितांना यांना भावनिक पत्र लिहिले. यात त्यांनी जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, असे म्हणत हा पराभव एक संधी म्हणून पहा असा सल्ला दिला. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सोशल मीडियावर त्याची कन्या डॉ. हिना गावितांना सोशल मीडियावर लिहिलेल्या पत्राची जिल्ह्यात चर्चा आहे. या पत्रात लिहिले आहे की,चि. हिनाताई, आज हे पत्र तुला लिहित असताना मनात खूप भावना आहेत. गेल्या दहा वर्षात तू तुझं निर्माण केलेलं स्वतंत्र अस्तित्व, त्यासाठी घेतलेली मेहनत, तुझा अभ्यासूपणा, नंदुरबारच्या जनतेसाठी तू विचारपूर्वक केलेली कामं, आणि त्यासाठी घेतलेले कष्ट, पाठपुरावा, या सगळ्याचा मी साक्षीदार आहे. संसदेत तू पहिल्यांदा पाऊल ठेवताना एका सामान्य बापासारखं माझंही काळीज भरून आलं होतं, की माझी ही छोटीशी लेक, एवढ्या मोठ्या संसदेच्या प्रांगणात कशी टिकेल. इतक्या दिग्गज लोकांमध्ये तिचा कसा निभाव लागेल? पण या साऱ्या शंकाच सिद्ध करत तू तुझं कर्तृत्व गेल्या दहा वर्षात परखड आणि स्पष्टपणे सिद्ध केलं त्याबद्दल मला तुझा प्रचंड अभिमान आहे. आयुष्यात अनेक वळणे येतात बेटा, याचा आपण सगळ्यांनी अनेकदा अनुभव घेतला आहे. आपल्या लेकरांचं आयुष्य सरळ आणि सुखी असावं असं प्रत्येकंच आई-वडिलांना वाटतं, पण आयुष्य असं नसतं. प्रत्येक नव्या वळणावर नवी आव्हाने आ वासून उभी असतात... त्या सगळ्यांना धीराने सामोरं जाणं, आणि अशा खडतर परिस्थितीतूनही वाट काढत यशाची कामना करणे, हेच खऱ्या योद्ध्याचं लक्षण आहे... आणि मला अभिमान आहे, की माझी लेक प्रत्येक आव्हानाला खंबीरपणे, समर्थपणे तोंड देऊन यश संपादन करते. या लोकसभा निवडणुकीचा निकाल मी एक संधी समजतो, विश्लेषणाची, अवलोकनाची, अभ्यासाची, थोड्या विश्रांतीची आणि गगनभरारी घेण्यासाठी पुन्हा एकदा पंख पसरण्याची... तू याला अपयश न समजता संधी समजूनच या निकालाकडे बघशील अशी मला खात्री आहे. शालेय वयापासूनच तू केवळ खेळाडू नव्हतीस तर खिलाडू वृत्तीची ही होतीस. त्यामुळेच समोर आलेल्या अनपेक्षित आव्हानाला तू खिलाडू वृत्तीने घेऊन त्यातून मार्ग काढून पुढे जाशील अशी मला नक्कीच खात्री आहे. तू स्वतः, आपले सगळे कुटुंबीय, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्रपक्ष या साऱ्यांनी घेतलेली मेहनत नंदुरबारचे लोक कधीच विसरणार नाहीत... तुझ्या अभ्यासू वृत्तीचं, मेहनत करण्याच्या तयारीचं आणि धीरोदात्तपणाचं मला कायमच कौतुक असेल बेटा. जिंदगी की यही रीत है ,हार के बाद ही जीत है!!हा आयुष्याचा नियम आहे. त्यामुळे, कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नकोस. नंदुरबारच्या जनतेने तुझ्यावर अमाप प्रेम केलं. त्यांचं प्रेम विसरु नकोस. त्यांच्या प्रेमातून उतराई होण्यासाठी आणखी काय करता येईल याचा नेहमीप्रमाणेच विचार कर, आणि स्वल्पविराम घेऊन पुन्हा एकदा रणरागिणीसारखी झुंजायला तयार हो... मी आणि तुझी आई सदैव तुझ्या पाठीशी आहोत !!नेहमीसारखीच सदैव हसत रहा!- - पप्पा..


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/luAWwIR

No comments:

Post a Comment