नागपूर: जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. अशातच वीज पडण्याच्या घटनाही वाढत आहे. अशीच एक घटना नागपुरात घडली आहे. मोहपा शहरा लगतच्या सावंगी व्यवहारे शिवारात पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वार्यासह विजेच्या गडगडासह जोरदार पाऊस झाला. यातच मोहपा शहरातील बुधवार पेठ येथे राहणारे रेवतकर दांपत्य पावसापासून बचावासाठी शेताच्या लगत असलेल्या मरा माय मातेच्या मंदिराच्या बाजूला झाडाखाली उभे असताना अचानक वीज कोसळली. या घटनेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर केशव रेवतकर (६२) आणि हिराबाई प्रभाकर रेवतकर (५५) असे मृतक दाम्पत्याचे नाव आहे. जोरदार पाऊस सुरू असल्याने शिवारातील कोणाचेही या घटनेकडे लक्ष गेले नाही. वीज पडल्याने दोघेही जागेवरच मृत्यूमुखी पडले. जवळपास अर्धा तास दोघेही जागेवरच पडून राहले. शेवटी शिवारातील शेतात कामासाठी जाणाऱ्या महिला शेतातून परत येत असताना त्यांना दोघेही झाडाखाली पडल्याचे दिसले. महिलांनी त्यांना तपासून बघितले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे दिसून आले. ही घटना एवढी भयानक होती की विजेमुळे दोघांच्याही अंगावरील कपडे अर्धवट जळाल्याचे उपस्थितांनी सांगितले. घटनेची माहिती उपस्थित त्यांनी त्यांच्या परिवारातील सदस्यांना दिली. परिवारातील सदस्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे उपचारार्थ आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे उपसभापती श्रावण दादा भिंगारे, मोहपा नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष समसुद्दीन शेख, नगरपालिका सदस्य श्रीकांत येनुरकर, संजय देशमुख यांच्या सह मोहपा शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे गर्दी केली होती. संपूर्ण मोहपा शहर हळहळ व्यक्त करत आहे. मृतकाच्या मागे तीन मुले आणि बराच मोठा आप्तपरिवार असल्याची माहिती आहे. दरम्यान विदर्भात पावसाला शनिवारपासून सुरूवात झाली आहे. सोमवारीसुद्धा नागपुरात पावसाळी वातावरण होते. शहरातील विविध भागांमध्ये दिवसभर पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या. मंगळवारीसुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांना तीव्रअतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून संपूर्ण विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tlZXaIB
No comments:
Post a Comment