प्रदीप भणगे, ठाणे : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सनम खान उर्फ नगमा या २३ वर्षांच्या विवाहित तरुणीनं ठाण्यातून थेट पाकिस्तान गाठलं. पाकिस्तानात जाण्यासाठी तिने खोटी कागदपत्र बनवून या कागदपत्रांच्या साहाय्याने ती थेट पाकिस्तानात पोहोचली. नंतर एक महिन्याच्या कालावधीनंतर ती भारतातही परतली. त्यानंतर तिने पुन्हा पाकिस्तानला जाण्याचीही तयारी केली होती. मात्र याची माहिती पोलिसांना लागल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खोटी कागदपत्र तयार करुन एक महिन्याचा व्हिसा मिळवला
सनम खान उर्फ नगमा ही मुळची उत्तर प्रदेशची आहे. तिचं वय २३ वर्ष आहे. तिचं लग्न झालं असून तिला दोन मुली आहेत. सध्या ती नवऱ्यापासून विभक्त राहते. तिची आई ठाण्यात लोकमान्यनगरमध्ये राहत आहे. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर सनम ही उत्तर प्रदेशातून तिच्या आईकडे ठाण्याला मुलींसह आली. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. त्याचवेळी इन्स्टावरुन तिची मैत्री पाकिस्तानातल्या बाबर नावच्या व्यक्तीसोबत झाली. ते दोघे जवळपास सहा महिने एकमेकांसोबत बोलत होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. बाबरने सनमला पाकिस्तानात येण्याचं सांगितलं. त्याच्या बोलवण्यावरुन सनम पाकिस्तानला जाण्यास तयारही झाली. तिने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली. त्यासाठी तिने खोटी कागदपत्र तयार केली आणि तिला एक महिन्याचा व्हिसा देखील मिळाला. यानंतर ती तिच्या दोन मुलींसह पाकिस्तानच्या एबॉटाबादमध्ये पोहोचली. तिथे तिने तरुणासोबत लग्नही केलं. नंतर एक महिनाच्या व्हिसामुळे ती त्याच्यासोबत राहिली. याचदरम्यान तिची आई आजारी असल्याने तिने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला.पुन्हा पाकिस्तानात जायचं होतं, पण...
नगमा पाकिस्तानातून ठाण्याला तिच्या आईकडे परतली. काही दिवस इथे राहिल्यानंतर तिला पुन्हा पाकिस्तानला जायचं होतं. यावेळी मात्र ती चौकशी यंत्रणांच्या रडारवर आली. तिला ठाणे पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी केली. त्यानंतर तिने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आता या प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय यंत्रणा करत आहेत. याच दरम्यान पोलीस व्हेरिफिकेशनवेळी मोठी चूक झाल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळेच सनमला व्हिसा मिळू शकला होता. तपास यंत्रणा आता सनम नक्की कशासाठी पाकिस्तानात गेली होती? ती तिथे कोणाला भेटली? भेटलेली व्यक्ती कोण होती? तिथे जाऊन तिने काय केलं? याची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान याप्रकरणी नगमा नूर उर्फ सनम खान आणि तिच्या आईला वर्तक नगर पोलिसांनी ॲम्बुलन्समधून मेडिकल चाचणीसाठी नेण्यात आलं असून तिच्या मुलींची आणि तिची वर्तक नगर पोलिसांनी कसून चौकशी केली जात आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/F2AnKhk
No comments:
Post a Comment