दीपक पडकर, बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यातच राडा झाल्याचे समोर आले आहे. आमराईत झालेली भांडणे फिर्यादी पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ आरोपीही धावत आले. त्यानंत पोलीस ठाण्यातच पुन्हा दोन्ही गटात हाणामारी झाली. पोलीस ठाण्यातील आरसा फोडला. या घटनेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणण्याचा देखील गुन्हा दाखल केला आहे. या व्यतिरिक्त मारहाणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बंटी जगताप, विकास जगताप, गणेश पाठक, ओम जगताप, तनू जगताप, अजय नागे, अनिता दिनेश जगताप (सर्व रा. आमराई, बारामती) आणि अन्य सात ते आठ अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारी देखील घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.शहर पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान हा प्रकार घडला. बंटी जगताप हा जखमी अवस्थेत शहर पोलीस ठाण्यात आला होता. त्याच्यासोबत अनिता दिनेश जगताप आणि अन्य पाच जण आले होते. पोलिसांनी त्यांना उपचाराची यादी दिल्यानंतर तेवढ्यात धीरज पडकर हा तेथे आला. त्याला बंटी जगताप आणि इतरांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एकाने तेथीलच पोलीस ठाण्यातील आरसा फोडून त्या आरशाची काच धीरजच्या पोटात घालण्यासाठी पुढे आणली. त्यास पोलिसांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे गौरव दिलीप जगतापने दिलेल्या फिर्यादीवरून, धीरज पडकर, सचिन पडकर, प्रेम रणपिसे या तिघांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गौरव हा सोमवारी मध्यरात्री घरी असताना धीरजने फोन करून गौरवला परिसरात नेले. तु माझ्या पत्नीला काय बोलला, अशी विचारणा करत त्याच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून वरील तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सचिन राजेंद्र पडकर (रा. भोईटे हॉस्पिटलशेजारी, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. बंटी जगताप याच्याविरुध्द तक्रार देण्यासाठी बारामती शहर पोलिस ठाण्यात आलो असता गेटवरच दहा ते बारा जण थांबले होते. पोलीस ठाण्यातच मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरुन बंटी जगताप, विकी जगताप, बबलू जगताप, अनिता जगताप, गणेश पाठक, अजय उर्फ गोट्या नागे, गौरव भंडारे व इतर सात ते आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/XyO9ao2
No comments:
Post a Comment