महेश पाटील, नंदुरबार: राज्य शासनाने भरपावसात पोलीस भरतीचा आदेश दिल्याने राज्यात पोलीस दलातर्फे १९ जूनपासून भरती प्रक्रिया सुरू झाली. नंदुरबार जिल्ह्यात १५१ पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे. आज २ जुलै रोजी सातशे महिला उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. पहाटे तीन वाजेपासून भर पावसात उमेदवार रांगा लावून उभे होते. महिला उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना दि. ४ जुलै रोजी चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे, असे असले तरी रात्री भर पावसात तीन वाजेपासून रांगेत उभे राहूनदेखील चाचणी न झाल्याने उमेदवारांच्या हिरमोड झाला.नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दलात १५१ पदांसाठी १९ जून पासून भरती प्रक्रिया सुरू आहे. दररोज सहाशे उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे. ३० जून पर्यंत पुरुष उमेदवारांची चाचणी पूर्ण झाल्याने १ जुलैपासून महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू आहे. आज मंगळवार २ जुलै रोजी सुमारे ७०० महिला उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. यातील ५३० महिला उमेदवार उपस्थित होते. मात्र, काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे मैदानी चाचणीत व्यत्यय आला. महिला उमेदवारांना परतावे लागले. पहाटेपासून रांगेत उभे राहून देखील पावसामुळे चाचणी पुढे ढकलण्यात आल्याने हिरमोड झाला. भर पावसात पोलीस भरती घेणे कितपत योग्य आहे, असा सवाल नातेवाईकातर्फे करण्यात येत आहे. मैदानी चाचणीसाठी स्थानिक नंदुरबार जिल्ह्यासह लगतच्या धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यातील महिला उमेदवारांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमधून देखील उमेदवार भरतीसाठी उपस्थित होते. बऱ्याचदा नोंदणी, कागदपत्र तपासणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ जात असल्याने दुपारी चाचणीला उशिर होतो. यामुळे अनेक महिला उमेदवारांकडून रात्रीच भरतीस्थळी रांग लावली जात असल्याचे दिसून येते.दोन जुलै रोजी पहाटे तीन वाजेपासून महिला उमेदवारांनी रांगा लावल्या होत्या. दरम्यान एक जुलै रात्रीपासूनच पाऊस सुरू असल्याने भर पावसात महिला उमेदवारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. पाच वाजेच्या सुमारास मैदानी चाचणी प्रक्रियेस सुरुवात झाली. रात्री सुरु असलेला पाऊस काल सकाळीदेखील सुरुच असल्याने अशा परिस्थितीत मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याने महिला उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना दि. ४ जुलै रोजी चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे, असे असले तरी रात्री तीन वाजेपासून रांगेत उभे राहूनदेखील चाचणी न झाल्याने इतर जिल्ह्यांमधून आलेल्या उमेदवारांचा मात्र हिरमोड झाला. यातील अनेकांना पोलीस दलाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी अनेकांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. यामुळे मात्र, त्यांना पुन्हा आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागणार आहे. याशिवाय दि. २४ जून रोजीदेखील पाऊस असल्याने त्या दिवशी चाचणीसाठी आलेल्या पुरुष उमेदवारांना दि. ६ जुलै रोजी चाचणीसाठी बोलाविण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून यापूर्वीच इतर जिल्ह्यातील येणाऱ्या महिला उमेदवारांसाठी निवासाची आणि भोजनाचीदेखील सोय लायन्स क्लबच्या सहकार्याने करण्यात आली आहे, असे असले तरी अनेक महिला उमेदवार चाचणीसाठी लवकर नंबर लागावा, यासाठी नातेवाईकांकडे राहून पहाटे तीन वाजेपर्यंत भरतीस्थळी पोहचत असल्याचे दिसून आले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/qTZXj8u
No comments:
Post a Comment