वाशिम: लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला. मात्र आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या माजी खा. भावना गवळी यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केल्याने सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या शिंदे सेनेच्या भावना गवळी यांची खासदारकीची डबल हॅट्रिक हुकली. आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याने खासदारकीची हॅट्रिक हुकली, पदरी आमदारकीची उमेदवारी पडली, अशी चर्चा वाशिम जिल्ह्यात रंगू लागली आहे. पूर्वी दोन टर्म वाशिम लोकसभा आणि नंतर तीन टर्म यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात असे सलग पाच वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या महाराष्ट्रातील एकमेव महिला खासदार भावना गवळी यांची पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांना सहाव्यांदा खासदार होता आले नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांचे समर्थक, कार्यकर्ते कमालीचे नाराज होते आणि पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीतून याचे चित्र स्पष्ट सुद्धा झाले. यवतमाळ, वाशिम जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या दोन्ही जिल्ह्यात भावना गवळी यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली असून दोन्ही जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे भावना गवळी यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. त्यांच्या जागेवर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. भावना गवळी निवडणूक काळात सक्रिय नव्हत्या म्हणून त्यांचा पराभव झाला, अशी चर्चा मतदार संघात होती. थोडक्यात शिंदे सेनेला आणि त्यांचं तिकीट कापण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला त्यांची ताकद दिसून पडली. अवघ्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात पालकमंत्री संजय राठोड यांच्या रूपाने शिंदेसेनेचा फक्त एक आमदार आहेत. लोकसभेत झालेले नुकसान आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये आणि आमदारांची संख्या वाढवण्यासह पक्ष बळकटीकरणासाठी भावना गवळी सक्रिय असणे शिंदे सेनेसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे शिवसेना पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली असल्याचे बोलले जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CyDNK4k
No comments:
Post a Comment