Breaking

Friday, July 19, 2024

Raigad News: साहेब आम्हाला हक्काची घरं कधी मिळणार? इर्शाळवाडीवासीयांची मुख्यमंत्र्यांकडे आर्त हाक https://ift.tt/KC0maZ7

अमुलकुमार जैन, रायगड: १९ जुलै २०२३ ची रात्र ईशाळवाडीवासियांसाठी काळ रात्रच ठरली. रात्रीच्या अंधारात दरड कोसळून इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाली. पत्त्यासारखी घरे कोलमडली. अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकजण ढिगाऱ्याखाली बेपत्ता झाले. शेकडो कुटुंबाचा संसार उद्धवस्त झाला. क्षणातच होत्याचे नव्हते झाले. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अजूनही इर्शाळवाडीवासियांना हक्काची घरं मिळाली नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्तांचे तातडीने पूर्नवसन करण्याचा शब्द दिला हेाता. परंतु एक वर्षानंतरही त्यांचे पूर्नवसन झालेले नाही. यामुळे आता सीएम साहेब, आम्हाला हक्काची घरं कधी मिळतील? असा आर्त सवाल आता ईशाळवाडीवासीय करत आहेत.

सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारचे काम सुरू

इर्शाळवाडीवर दरड कोसळून २७ जणांना जीव गमवावा लागला होता तर ७८ जण बेपत्ता झाले होते. १९ जुलैची ही काळी रात्र जणू वाडीतल्या आदिवासी बांधवांचे जीवन अंधारमय केलं होत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशाळवाडी दुर्घटनाग्रस्त भागाला भेट देऊन स्वत: मदत कार्याचा आढावा घेतला होता. त्यामुळे राज्य शासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू झाले होते. शासनाने त्यावेळी दरडग्रस्थांची तात्पुरता व्यवस्था केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरडग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. सिडकोच्या माध्यमातून राज्य सरकारने काम ही सुरू केले. परंतु आज एक वर्ष पूर्ण होऊन देखील येथील दरडग्रस्थ आपल्या निवाऱ्यासाठी उपेक्षितच आहेत.

सिडको ३३ कोटी रूपये खर्च करणार

इर्शाळवाडी दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सिडकोद्वारे उभारण्यात येणाऱ्या ४४ घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. सिडकोच्या वतीने इथल्या नागरिकांसाठी अंगणवाडी, समाजमंदिर, उद्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान आदी सोयी सुविधा उपलब्ध करणार आहे. यासाठी सिडको ३३ कोटी रूपये खर्च करणार आहे. नव्या इर्शाळवाडीमध्ये घरे मोठी असली तरी घरातील मृत झालेल्या माणसांची उणीव कायम घर करून राहतील, अशीच भावना ईशाळवाडीवासियांमध्ये व्यक्त होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6LTR8Wg

No comments:

Post a Comment