नवी दिल्ली : संसदेच्या नवीन इमारतीची रचना, बांधकाम आणि तेथील सुविधांचा आढावा घेण्याची मागणी काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी शुक्रवारी ‘एक्स’वर केली; तसेच सर्व प्रमुख पक्षांची मतेही विचारात घेतली जातील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.‘नव्या इमारतीत भारतीय संसदीय लोकशाहीच्या महान परंपरेचे प्रतिबिंब उमटण्यासाठी बरेच काही करणे आवश्यक आहे. संसद ही भारतातील जनतेची आहे, एका पक्षाची किंवा एका व्यक्तीची नाही. सर्व प्रमुख पक्षांची मते योग्य वेळी घेतली जातील,’ अशी आशा गोगोई यांनी व्यक्त केली.संसदेच्या नव्या इमारतीच्या लॉबीत पाणी गळती झाल्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी गुरुवारी मोदी सरकारवर निशाणा साधला; तसेच त्यांनी जुन्या, मजबूत संसद भवनाचे कौतुक केले. या पार्श्वभूमीवर गोगोई यांनी आपले मत व्यक्त केले.काँग्रेसचे लोकसभा खासदार मणिकम टागोर यांनी नव्या संसद भवनाच्या लॉबीतील छतावरून पाणी गळत असल्याचा आणि ते गोळा करण्यासाठी खाली ठेवलेल्या बादलीचा व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट केला होता. लोकसभेत या विषयावर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव आणण्याची नोटीसही त्यांनी सादर केली. हा व्हिडिओ शेअर करताना टागोर यांनी ‘एक्स’वर म्हटले होते की, ‘बाहेर पेपर गळती, आत पाण्याची गळती.’ समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता.दरम्यान, नव्या संसद भवनात लॉबीवर काचेचे घुमट बसविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चिकट पदार्थाचे पावसामुळे थोडे विघटन झाल्यामुळे ही किरकोळ पाणीगळती झाली असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने म्हटले आहे. ही समस्या वेळीच लक्षात आली आणि तातडीने उपाययोजना करण्यात आल्या असून, आता पाण्याची गळती होत नसल्याचे सचिवालयाने स्पष्ट केले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ztGq8Es
No comments:
Post a Comment