म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बदलापूरमधील अत्याचार प्रकरणानंतर गृह विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना अधिक कडक करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यभरात महिलांच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्या अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.सर्व पोलिस आयुक्तालये व पोलिस अधीक्षकस्तरावर घटक प्रमुखस्तरावर महिला साह्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सर्व पोलिस ठाणेस्तरावर महिला पोलिस कक्षही सज्ज करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शाळा व महाविद्यालय परिसरात, गर्दी व निर्जनस्थळी दामिनी पथकाद्वारे रस्ते गस्त, दुचाकी, चारचाकी वाहनांद्वारे गस्त घालत गुन्ह्यांना प्रतिबंध केला जात आहे. कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार रोखण्याकरिता पोलिस काका तसेच पोलिस दीदी नेमण्यात आले आहेत. निर्भया पथक, भरोसा सेल यासारखे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांच्या समुपदेशनासाठी १२४ समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच डायल ११२ च्या माध्यमातून तातडीने मदत पुरविण्यात येत आहे, असेही गृह विभागाने स्पष्ट केले.
मुंबई शहर सुरक्षा प्रकल्प
सार्वजनिक ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर परिणामकारकपणे आळा घालण्याच्या दृष्टीने व त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निधीमध्ये केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा ६० आणि ४० टक्के आहे. या योजनेच्या अंमलबजावणीस केंद्र शासनाने ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेकरिता पोलिस आयुक्त, मुंबई हे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्य करीत आहे. या योजनेंतर्गत गर्दी व संवेदनशील ठिकाण, मागोवा व निराकारण, समाजमाध्यमांचा दुरुपयोग करणाऱ्यांचा शोध घेणे, सायबर न्यायवैद्यक व मोबाईल डाटा टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. पोलीस दीदी व महिला सुरक्षाविषयक जनजागृती करण्यात येत आहेत. मदत व पुनर्विलोकन कक्ष, प्रतिसाद वाहने यांची खरेदीही करण्यात येत आहे, अशी माहिती गृह विभागाकडून देण्यात आली आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ydDezBI
No comments:
Post a Comment