Breaking

Thursday, August 15, 2024

लाडकी बहिण योजनेला विरोध करणारे सावत्र भाऊ मतं मागायला आले तर त्यांना जोडे दाखवा, मुख्यमंत्र्यांची टीका https://ift.tt/Lo6qPHK

बदलापूर : लाडकी बहीण योजनेला ज्यांनी विरोध केला, ते तुमचे सावत्र भाऊ उद्या तुमच्याकडे मतं मागायला आले तर त्यांना जोडे दाखवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधकांवर नाव न घेता टीका केली. बदलापूर नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर तसंच विरोधी पक्षावर टीका केली.

आम्ही घेणारे नाही, हप्ते देणारे आहोत - मुख्यमंत्री

या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रातल्या माझ्या गोर-गरीब बहिणींना १५०० रुपयांचं मोल माहित आहे. पण कोट्यवधींमध्ये लोळणाऱ्यांना आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना दीड हजारांची किंमत काय कळणार? अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर नाव न घेता केली. तसंच अगोदरचं सरकार हे हप्ते घेणारं होतं, आम्ही हप्ते देणारे आहोत, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

'सावत्र आले तर त्यांना जोडे दाखवा'

लाडकी बहीण योनजेवर विरोधकांनी मोठी टीका केली, ते कोर्टात गेले, मात्र लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. आता हेच तुमचे सावत्र भाऊ तुमच्याकडे मतं मागायला आल्यावर त्यांना जोडे दाखवा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

८० लाख महिल्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा

दरम्यान, १४ ऑगस्टपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. १४ ऑगस्टपासून २४ तासांत ८० लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते पोहोचले आहेत. तर संपूर्ण राज्यात योजनेची घोषणा केल्यापासून आतापर्यंत १ कोटी ६२ लाख महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र रक्षाबंधनाच्या आधीच स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी महिलांना लाडकी बहीण योजनेचे त्यांचे पहिले दोन हप्ते खात्यात जमा झाले आहेत. तसंच ज्या महिलांना अद्याप हप्ते आले नाहीत, त्यांना १७ ऑगस्टपर्यंत येतील, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/3zWo2Vv

No comments:

Post a Comment