अमुलकुमार जैन, रायगड : गंतव्य तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो, पंख काहीच नसतात, उडण्यासाठी हिंमतच पुरेशी असते... असंच काहीस स्वप्न लहानशा गावातील महिलांनी पाहिलं आणि ते पूर्णही केलं. घरातील कामात व्यस्त असलेल्या महिला त्यांच्या रोजच्या कामातून बाहेर पडून गावात स्वतःचा व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. याचा विचार कोणी केला नसता, परंतु आज जिल्ह्यातील ग्रामीण महिलांनी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील भक्ती महिला समुहात सहभागी होऊन स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला आहे.सुरुवातीच्या काळात या महिलांनी गट तयार केले. त्यानंतर त्यांनी काम शिकून घेतलं आणि थोडीफार बचत करायला सुरुवात केली. त्या एकमेकांशी गरजेनुसार व्यवहार करू लागले आणि आता स्वत:चा व्यवसाय करून दरमहा हजारो रुपये कमवू लागल्या आहेत.निजामपूर गावातील भक्ती महिला समुहाच्या बचत गटातील सहभागी महिलांनी आपली विचारसरणी बदलली आणि काहीतरी करण्याच्या ध्यासाने त्या पुढे सरसावल्या. कौशल्यातून शिकून बचत गटातील प्रत्येक महिला आता सात ते आठ हजार रुपये कमावत आहे. विशेष म्हणजे समुहातील महिला स्वत: स्वावलंबनाचं उदाहरण घालून इतर महिलांनाही त्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहे. भक्ती महिला समुहाच्या बचत गटात संघटीत असलेल्या या महिला जेवणाच्या र्आडर, सायबर कॅफे, पापड व्यवसाय, कपड्यांपासून दैनंदिन वापराच्या वस्तू गावातच बनवून त्याची विक्री निजामपूर येथे करत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना भक्ती महिला समुहाच्या अध्यक्षा अवनी हुजरे यांनी सांगितले की, निजामपूर येथील दहा महिलांनी एकत्रित येऊन आमच्या बचत गटाची स्थापना केली. ७ डिसेंबर २०१९ रोजी ही स्थापना झाली. बचत गटाने आजपर्यंत बँक ऑफ महाराष्ट्र, एचडीएफसी आणि बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सहा वेळा अर्थ सहाय्य घेतलं आहे. आता बँक ऑफ इंडियाचे सहा लाखांचे कर्ज सुरू असून त्याचा हप्ता महिन्याला चौदा हजारच्या आसपास आहे. हा हप्ता प्रत्येक महिलेला चौदाशे रुपये वाटणीला येत आहेत. बचत गटाच्या सचिव म्हणून अश्विनी अनिकेत हुजरे या काम पाहत आहेत.भक्ती महिला समुहाच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय उभारुन महिलांनी आपल्या गावात आणि समाजात एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. या माध्यमातून त्या केवळ स्वत:च्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात यशस्वी होत नाही, तर इतर महिलांनाही स्वावलंबी बनवण्यात मदत करत आहेत. कपडे शिवण्याचे काम करून त्या महिन्याला हजारो रुपये कमवत आहे. तसंच या महिला दरमहा शंभर रुपये काढून बाजूला ठेवतात. बचत गटातील ज्या महिलेला गरज पडेल तिला नाममात्र एक टक्का व्याजाने ते पैसे दिले जातात आणि मदतीचा हात दिला जातो.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Y5iMC9d
No comments:
Post a Comment