Breaking

Wednesday, September 18, 2024

मुंबई - पुणे हायवेवर एसबीची धडक कारवाई, ४० हजारांची लाच घेणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या https://ift.tt/qz0LaT4

रायगड, अमुलकुमार जैन : रायगड जिल्ह्यातील विविध विभागात भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना अमित राजेश पंडया, (वय ४७ वर्षे) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्या मुंबई-पुणे हायवेवर खालापुर येथे ताब्यात घेतले असून याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात संबंधित प्रकाराची तक्रार प्राप्त झाली. तक्रारदार हे शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. तक्रारदार आणि त्यांच्या सोबतचे इतर तीन शिक्षक यांचे जुन २०२४ ते जुलै २०२४ या कालावधीचा थकलेला पगार देण्याचा आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातून काढण्यासाठी लोकसेवक अमित राजेश पंडया यांनी ४०,००० रूपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांच्याकडे पनवेल बस स्थानक येथे ४०,००० रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम घेण्यासाठी लोकसेवक अमित पंडया आला. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता, लोकसेवकाला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यामुळे त्यादिवशी प्लॅन फसला पण काल पुन्हा म्हणजेच १८ सप्टेंबरला मुंबई-पुणे हायवेवर खालापुर फाटा येथे सापळा लावला, लोकसेवक अमित पंडया यांना तक्रारदार यांचेकडून ४०,००० रूपय लाचेची रक्कम स्विकारताना लोकसेवकाला पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सदर कारवाई ही लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहाय्यक फौजदार अरूण करकरे, पोलिस हवालदार महेश पाटील, पोलिस नाईक सचिन आटपाडकर, चालक पोलिस हवालदार सागर पाटील यांच्या पथकाने केली आहे.

पुन्हा शिक्षण विभाग चर्चेत

जिल्हा परिषदमधील शिक्षण विभाग हा नेहमीच चर्चेत असलेला विभाग आहे. बदली, अनुकंपा भरती यासारख्या विषयात नेहमी अर्थकारण होत असल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी पकडलेला लोकसेवक अमित राजेश पंड्या अशोक जाधव हा उपशिक्षक असून तो गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात काम करीत असून अमित पंड्या याची त्याच्या नियुक्ती असलेल्या जागेवर त्वरित पाठवण्याची सूचना कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तीन महिन्यांपूर्वी प्राथमिक शिक्षण अधिकारी पूनिता गुरव यांना केली असून सुद्धा त्यांनी कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले होते. अमित पंड्या यांना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात प्रती नियुक्तीवर कोणाच्या वरदहस्त होता याचीही चौकशी करणे गरजेचे आहे.या प्रकरणात कार्यालय प्रमुख म्हणून प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि इतर अधिकारी कर्मचारी यांची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Vw4yRHE

No comments:

Post a Comment