Breaking

Thursday, September 5, 2024

मला 'मोक्का' लावण्याचा अनिल देशमुखांचा प्रयत्न; गिरीश महाजनांचा खळबळजनक आरोप https://ift.tt/rJj37yi

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगावातील स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांसह राज्यस्तरीय नेत्यांच्या दबावातून तत्कालीन गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सत्तेत असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला मोक्का लावण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार आता सीबीआयच्या तपासात सिद्ध झाला असल्याने त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी जळगावात पत्रकारांशी बोलताना केली.जळगाव जिल्हा परिषदेतील शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी जळगावात आले असताना भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून दाखल झालेला गुन्हा तसेच आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर आपली भूमिका व्यक्त केली. महाजन म्हणाले की, देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याचा सीबीआयने घेतलेला निर्णय योग्यच असून, त्यांनी नियमात राहून हा निर्णय घेतला आहे. देशमुख यांनी त्यावेळी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तत्कालीन जळगाव पोलिस अधीक्षकांवरदेखील दबाव टाकल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. देशमुख यांना तेव्हा, शरद पवार व एकनाथ खडसे गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे अनिल देशमुख यांनीच मला सांगितल्याचा दावाही गिरीश महाजन यांनी यावेळी केला. अनिल देशमुख आता खोट्यानाट्या गोष्टी करीत असल्याचा आरोपही महाजन यांनी केला. ‘बीएचआर’प्रकरणी पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांच्यावर झालेला गुन्हाही योग्य असल्याचे ते म्हणाले. ‘दोन दगडांवर पाय ठेवणारे खडसे दुटप्पी’भाजपमध्ये प्रवेश न मिळाल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काम करीत असल्याचे सांगणारे एकनाथ खडसे हे दोन दगडांवर पाय ठेवण्याची दुटप्पी भूमिका घेत आहेत. वेगवेगळ्या पक्षाची पदे आपल्याच घरात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आम्ही एकत्र यावे, असे म्हटले असेल तरी आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षांत असल्याचे महाजन यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/pE4kfPD

No comments:

Post a Comment