Breaking

Thursday, October 31, 2024

सीमेवर सैनिकांकडून मिठाईची देवाण-घेवाण; साडेचार वर्षांपासून निर्माण झालेला तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा https://ift.tt/hxqapKe

नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील संघर्षस्थळांवरून सैन्यमाघारीच्या पार्श्वभूमीवर संबंधात ‘गोडवा’ निर्माण झाला आहे. पूर्व लडाखसह अन्य ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उभय देशांच्या सैनिकांनी गुरुवारी दिवाळीनिमित्त परंपरेप्रमाणे मिठाईची देवाण-घेवाण केली.‘अरूणाचल प्रदेशमधील बूम ला आणि किबिथू, लडाखमधील चोशूल-मोल्दो, दौलत बेग ओल्डी आणि सिक्कीमधील नथु ला आदी ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीनच्या सैनिकांनी परंपरेप्रमाणे परस्परांना मिठाई वाटप केले. पूर्व लडाखमधील कोंग ला, केके पास आणि हॉट स्प्रिंग आदी ठिकाणीही उभय देशांच्या सैनिकांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली,’ अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.दिवाळीसह अन्य महत्त्वाच्या प्रसंगी भारत आणि चीन यांच्या सैनिकांकडून मिठाईची देवाण-घेवाण करण्याची परंपरा आहे. गेल्या साडेचार वर्षांपूर्वी पूर्व लडाखमध्ये उफाळून आलेल्या सीमावादावर तोडगा निघाल्याच्या पार्श्वभूमीवर उभय देशांदरम्यान मिठाईची देवाण-घेवाण विशेष मानली जाते.पूर्व लडाखमधील डेमचोक आणि देप्सांग या संघर्षस्थळांवरून दोन्ही देशांच्या सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे बुधवारी लष्करी सूत्रांनी म्हटले होते. सैन्यमाघारी प्रक्रियेची पडताळणी सुरू असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जवानांची गस्त अद्याप सुरू झालेली नाही. गस्तीबाबतच्या प्रक्रियेसंदर्भात दोन्ही देशांच्या स्थळ कमांडर पातळीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.संघर्षस्थळांवरून सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्वीप्रमाणे गस्त घालण्याचा भारतीय जवानांचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल २०२०पूर्वीची स्थिती निर्माण होणार आहे.भारत आणि चीन यांच्यात सैन्यमाघारीबाबत मतैक्य झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी २१ ऑक्टोबरला जाहीर केले होते. त्यामुळे पूर्व लडाखमधील सीमेबाबत भारत आणि चीन यांच्यात गेल्या साडेचार वर्षांपासून निर्माण झालेला तिढा सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. आता सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने भारत-चीन संबंध सुधारण्याचे संकेत आहेत.‘दोन्ही देशांकडून अंमलबजावणी’बीजिंग : भारत आणि चीन यांची सैन्यमाघार ‘प्रगतिपथावर’ असल्याचे चिनी लष्कराने गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याबाबत चिनी लष्कराने भाष्य केलेले नाही. ‘भारत आणि चीनने राजनैतिक आणि लष्करी पातळीवर लडाखमधील सीमावादावर तोडगा काढला. त्यानुसार सैन्यमाघारीची पद्धतशीर अंमलबजावणी दोन्ही देशांकडून सुरू आहे,’ असे चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झिओगांग यांनी सांगितले.‘सैन्यमाघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण’इटानगर : अनेक ठिकाणी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैन्यमाघारीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले. तवांगमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे आणि मेजर रालेंगानो बॉब खाथिंग यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. खराब हवामानामुळे सिंह हे प्रत्यक्ष तवांगमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत. आसामच्या तेझपूरमधून ऑनलाइन पद्धतीने ते कार्यक्रमात सहभागी झाले. सीमावादाचा मुद्दा सैन्यमाघारीच्या पलिकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, असेही राजनाथ सिंह म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/dyS8VHL

No comments:

Post a Comment