मुंबई: जागावाटपासाठी महाविकास आघाडीचा बैठकांचा सपाटा सुरू असताना अखेर बुधवारी आघाडीने जागावाटपाचे ‘समसूत्र’ जाहीर केले. यानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांना प्रत्येकी ८५ जागा मिळणार आहेत. आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली. आम्ही एकत्र आहोत, असा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला.‘जवळपास २५५ जागांवर आमची पूर्ण सहमती झाली आहे. त्याची यादीही तयार झाली आहे. उरलेल्या जागांपैकी १० जागांवर आमचे मित्रपक्ष लढतील. त्यांच्याशी आमची चर्चा सुरू राहील. तसेच उर्वरित २३ जागांवरही गुरुवारी चर्चा होईल,’ अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. ‘महाविकास आघाडी विधानसभेच्या २८८ जागा पूर्ण ताकदीने लढवेल आणि सत्तेवर येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘गेले काही दिवस आम्हा सर्वांना तुम्ही जागावाटपाविषयी विचारत होतात, पण आता आम्ही सर्व एकत्र आहोत. आमची शेवटची बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. महाविकास आघाडीचे जागावाटप अत्यंत सुरळीत पार पडले. आमच्या तिन्ही पक्षांत आणि इतर समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष या सर्वांना सामावून घेणारे जागावाटप पूर्ण झाले आहे,’ असे राऊत यांनी सांगितले.‘उबाठा’च्या यादीत दुरुस्ती‘शिवसेनेने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. याकडे लक्ष वेधले असता, शिवसेना मुख्यालयातून जाहीर केलेल्या त्या यादीत काही दुरुस्त्या आहेत. आमची ती प्रशासकीय चूक कशी काय झाली, ते तपासून पाहू. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेवर गुरुवारी नव्याने चर्चा होईल. उरलेल्या यादीवर मित्रपक्षांचा दावा असला, तरी त्यावर मार्ग काढला जाईल,’ असे राऊत यांनी नमूद केले. अजय चौधरी प्रतीक्षेतशिवडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभा निवडणूक समन्वयक, तसेच लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांनी उमेदवारी मागितल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा निर्णय होऊ शकलेला नाही. मुंबईवरून अडलेमुंबईतील भायखळा, वांद्रे पूर्व, वर्सोवा या तीन मतदारसंघांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केल्याने महाविकास आघाडीमधील रस्सीखेच बुधवारी संध्याकाळपर्यंत सुरू होती. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत बाजी मारलेली असतानाही काँग्रेसने केलेल्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत सुंदोपसुंदी सुरू होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/AbTp3gt
No comments:
Post a Comment