स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्याने शरद पवारांच्या नेत्यावर टीकास्त्र सोडलं. साहेब कुठे काय बोलायचे याचं भान ठेवलं पाहिजे, लोकसभेबद्दल मला सुद्धा बोलता येतं, कारण मला कोणाच्या बापाची भीती नाही, बंटी पाटलांसारखं जर मी वागायला लागलो, तर काँग्रेस सोडून जिल्ह्यात अन्य कोणतेही पक्ष शिल्लक राहणार नाहीत, अशी टीका काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सचिन जगदाळेंवर केली आहे.सांगली जिल्ह्यातील नांद्रे गावांमधील काँग्रेसच्या प्रचार सभेत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सचिन जगदाळे यांना फटकारले. माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे तिघे एकत्र मिळून, सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा प्रचार करताना का दिसत नाहीत, असं राष्ट्रवादीचे नेते सचिन जगदाळे यांनी आपल्या भाषणात वक्तव्य केलं होतं, त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सचिन जगदाळे यांच्या वक्तव्याच्या खरपूस समाचार घेतला. सचिन जगदाळे साहेब कुठे काय बोलायचे याचं भान ठेवलं पाहिजे, लोकसभेबद्दल बोलायला गेला तर मला सुद्धा भरपूर बोलता येतं. पण ते तुम्हाला पचणार असेल तर मी बोलेन. कारण मला कोणाच्या बापाची भीती नाही. मी स्वयंभू आहे. माझे वडील शून्यातून निर्माण झाले आणि माझ्या मतदारसंघात माझे गड मजबूत आहेत. बंटी पाटलांचं कौतुक करणार असाल तर मग, बंटी पाटलांसारखं जर मी वागायला लागलो तर काँग्रेस सोडून अन्य कोणतेही पक्ष जिल्ह्यात शिल्लक राहणार नाहीत. पण मी संयमानं चाललोय. लोकसभेमध्ये काय काय घडलं कोणी कोणी काय काय केलं. कोण पुढे होतं, कोण मागे होतं, ही सांगण्याची आता वेळ नाही. तरीपण आता कुणाला काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा पण मला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की, महाआघाडीच्या सांगली जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून आणायचे आहेत, असं आवाहन माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी केलं. सांगली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या नांद्रे येथील प्रचार सभेत माजी मंत्री विश्वजीत कदम बोलत होते. उमेदवार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे सचिन जगदाळे, काँग्रेसचे महावीर पाटील यांच्यासहित महाआघाडी मधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून पृथ्वीराज पाटील यांना पक्षांअंतर्गत आव्हानाला सामना करावा लागत आहे. काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षातील सर्व आजी-माजी नगरसेवक जयश्री पाटलांचा प्रचार करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज पाटील यांच्याबरोबर महाविकास आघाडीतील ठराविक नेते आणि कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने मिरज मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारासाठी सर्वच महाविकास आघाडीतील प्रमुख नेते हे ताकतीने प्रचार करत आहेत त्याच पद्धतीने सांगलीच्या काँग्रेस उमेदवाराचा देखील प्रचार व्हावा, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून बोलली जात आहे
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/7olFbUr
No comments:
Post a Comment