मुंबई : मुंबईतील मतदान सुरळीत पार पडल्यानंतर मतमोजणीला गडबड गोंधळ होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील ३६ मतमोजणी केंद्रावर नियोजनबद्ध सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली असून, मतमोजणी केंद्रापासून ३०० मीटर परिसरात विनाकारण जाण्यास मनाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या ३६ मतदारसंघांकरिता बोरिवली पूर्वेकडे दोन ठिकाणी, दहिसर, मुलुंड, कांजूर, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी, विक्रोळी, आणि मालाडमध्ये दोन ठिकाणी, सांताक्रूझ, विलेपार्ले, विद्याविहार, कलिना, खार, धारावी, सायन, अँटॉप हिल, दादर, महालक्ष्मी, भायखळा, गिरगाव, मुंबई सेंट्रल आणि फोर्ट या ठिकाणी आज, शनिवारी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्राचे बंदोबस्त प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. अटीतटीच्या लढती, संभाव्य विजयी उमेदवार, निकालानंतरची संभाव्य परिस्थिती, मतमोजणी केंद्रावर होणारी गर्दी याचा आढावा पोलिसांच्या वतीने घेण्यात आला असून, त्यानुसार मतमोजणी केंद्रावर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस, निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच परवानगी देण्यात आलेल्या व्यक्तिंव्यतिरिक्त इतर कुणालाही मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटरच्या आतमध्ये जाण्यास किंवा जमाव जमवण्यास, सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राबरोबरच मुंबई शहरात इतर ठिकाणीदेखील पोलिसांचा बंदोबस्त असेल. विजयी किंवा पराभव झालेल्या उमेदवाराचे निवासस्थान, राजकीय पक्षांची कार्यालये, संवेदनशील भाग या ठिकाणी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. कायदा आणि सुवस्था बिघडेल असे कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वाहतुकीचेही नियमन मतमोजणी केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि त्यांची वाहने यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूककोंडी होऊ शकते. संभाव्य परिस्थितीचा आढावा घेत वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणी वाहनांना बंदी घातली आहे. काही रस्ते एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Q9RXHeA
No comments:
Post a Comment