संजय घारपुरे : भारतीय संघाचा पहिला डाव १५० धावांत आटोपला. पण दुसऱ्या डावात मात्र भारताने एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या. भारताच्या संघात हा एवढा मोठा बदल कसा झाला. आता दुसऱ्या डावात भारताकडून कशा धावा होत आहेत, याचं खरं कारण आता ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यूज मॅकडोनाल्ड यांनी सांगितले.‘आमच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केली, असे म्हणणे चुकीचे आहे. खेळपट्टी आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर कोरडी झाली. त्याचा भारतीय फलंदाजांना फायदा झाला,’ असे ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यूज मॅकडोनाल्ड यांनी सांगितले. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या क्रिकेट कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत दुसऱ्या दिवसाची खेळपट्टी पाहून धक्का बसल्याचेही त्यांनी सांगितले. ‘दुसऱ्या दिवसाची खेळपट्टी खूपच कोरडी होती. दुसऱ्या दिवशीही काही प्रमाणात ओलसरता असेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे खेळपट्टीचा रंग पाहून धक्का बसला. या प्रतिकूल खेळपट्टीमुळे चेंडू कमी स्विंग; तसेच सीम झाला. भारतीय फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली,’ असेही ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक म्हणाले. ‘आमच्या गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर मारा केला. काही वेळा फलंदाज चकलेही होते. त्या वेळी चेंडूने बॅटला स्पर्श केला असता, तर नक्कीच वेगळे चित्र दिसते असते. आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीस काहीसा जास्तच आखूड टप्प्यावर मारा केला; पण त्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली,’ असे सांगून मॅकडोनाल्ड यांनी गोलंदाजांची पाठराखण केली. आक्रमक क्षेत्ररचना केल्यास प्रतिस्पर्ध्याच्या धावा वाढण्याचाही धोका असतो. त्यामुळे खेळावर नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असेल, असेही ते म्हणाले. मॅकडोनाल्ड पुढे म्हणाले की, " भारतीय संघाचे सध्या वर्चस्व आहे; पण तिसऱ्या दिवशी परिस्थिती बदलूही शकते. कसोटीत परिस्थिती एखाद्या सत्रात बदलूही शकते. दुसरा नवा चेंडू २० षटकांत मिळणार आहे. त्यानंतर नक्कीच चित्र बदलू शकते. अर्थात, आम्हाला योग्य व्यूहरचना करून त्यानुसार खेळ करणे आवश्यक आहे. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आम्ही चांगला खेळ करू, असा विश्वास मला आहे. "
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OdcwIWe
No comments:
Post a Comment