Breaking

Wednesday, November 6, 2024

श्रेयस अय्यरचे दमदार कमबॅक, आयपीएल लिलावापूर्वीच साकारली धडाकेबाज खेळी https://ift.tt/RhSEU7L

गौरव गुप्ता : एका सामन्याच्या विश्रांतीनंतर मुंबईस संघात परतलेल्या श्रेयस अय्यरने फटकेबाजी दीडशतक केले. भारतीय फलंदाज कोलमडत असताना आणि आयपीएलचा लिलाव तीन आठवड्यांवर असताना श्रेयसनेही ही लक्षवेधक खेळी केली. त्याने रणजी करंडक स्पर्धेतील तीन आठवड्यांतील दुसरे शतक बुधवारी केले. त्याने शतकवीर सिद्धेश लाडसह २३१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे मुंबईने विरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट साखळी सामन्यातील पहिल्या दिवसअखेर ३ बाद ३८५ अशी धावसंख्या उभारली.श्रेयसने वांद्रे कुर्ला संकुलातील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवताना सहकारी सिद्धेशला बचावात्मक खेळी करण्यास भाग पाडले. त्यापूर्वी पृथ्वी सावऐवजी संघात पसंती दिलेल्या अंगक्रिश रघुवंशीने आक्रमक ९२ धावांची खेळी केली होती. त्याने मुंबईच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचताना निवड समितीने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाज प्रत्येक धावेसाठी संघर्ष करीत होते. या पार्श्वभूमीवर श्रेयसचे फटकेबाज दीडशतक जास्त लक्षवेधक ठरते. त्याने महाराष्ट्राविरुद्ध १९० चेंडूंत १४२ धावांची खेळी केली होती. ते त्याचे २०२१च्या नोव्हेंबरनंतरचे पहिले शतक होते. त्याने सलग दुसऱ्या सामन्यात आक्रमक खेळी करून निवड समितीला आपली आठवण करून दिली. दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेसाठी आणि भारत ‘अ’ संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी श्रेयसचा विचार झाला नाही. त्याला जानेवारीत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींनंतर वगळले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या मध्यवर्ती करारातून डच्चू देण्यात आला. दुलीप स्पर्धेत अपयशी ठरल्यावर त्याच्यावर टीका झाली. इराणी करंडक लढतीत त्याने अर्धशतकच केले. रणजी मोसमातील पहिल्या लढतीत तो भोपळाही फोडू शकला नव्हता. त्यानंतर मात्र त्याने दोन शतके केली आहेत. महाराष्ट्र आणि ओडिशाच्या गोलंदाजीचा दर्जा उच्च नक्कीच नाही; पण त्याने तीन सामन्यांत १०८च्या सरासरीने ३२४ धावा केल्या आहेत. आता त्याची द्विशतकाकडे भक्कम वाटचाल सुरू आहे. त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीपेक्षा उकाडा आणि उष्णता फलंदाजांचे कस बघत होते. मात्र, श्रेयस आणि सिद्धेशने हार मानली नाही.अनुभवी मध्यमगती गोलंदाज बिप्लब समांताराय याने लागोपाठच्या चेंडूवर अंगक्रिश रघुवंशी आणि अजिंक्य रहाणेला बाद केले होते. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयसने गोलंदाजीवर हल्ला केला. त्याने ६१ चेंडूंत अर्धशतक, १०१ चेंडूंत शतक केले. श्रेयसला रोखण्यासाठी ओडिशाने सात गोलंदाजांचा वापर केला; पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांना प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचाही फटका बसला होता. सूर्यकांत प्रधानने आयुष म्हात्रेला पाचव्या षटकांत बाद केले. मात्र, अंगक्रिश आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती दिलेला सिद्धेश यांनी २११ चेंडूंत १३५ धावा जोडल्या. श्रेयस आणि सिद्धेशने २९८ चेंडूंत २३१ धावा जोडल्या. त्यात श्रेयसचा वाटा १६४ चेंडूंतील १५३ धावांचा होता. त्यावरून श्रेयसच्या आक्रमक खेळीची कल्पना येईल.स्कोअरबोर्ड ः मुंबई ३ बाद ३८५ (अंगक्रिश रघुवंशी ९२ - १२४ चेंडूंत १३ चौकार आणि ३ षटकार, आयुश म्हात्रे १८, सिद्धेश लाड खेळत आहे ११६ - २३४ चेंडूंत १४ चौकार, अजिंक्य रहाणे ०, श्रेयस अय्यर खेळत आहे १५२ - १६४ चेंडूंत १८ चौकार आणि ४ षटकार, सूर्यकांत प्रधान १२-४-३६-१, बिप्लाब समांताराय ७-२-३६-२) वि. ओडिशा


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/8SAGXe5

No comments:

Post a Comment