Breaking

Wednesday, November 13, 2024

संपूर्ण संघ फक्त ५ धावांत ऑलआऊट, ६४७ धावांनी पराभव, १० फलंदाज शून्यावर बाद, काय घडलं पाहा https://ift.tt/v8KJDog

विनायक राणे, मुंबई : संपूर्ण संघ ५ धावांत गारद... एकाच फलंदाजाकडून ४ धावांचे योगदान, एक धाव अवांतर अन् बाकीचे दहा फलंदाज शून्यावर बाद! ही अतीसुमार कामगिरी आहे ती ऑक्सफर्ड इंटरनॅशन स्कूलची. यामुळे मंगळवारी हॅरिस शील्ड आंतरशालेय स्पर्धेच्या सामन्यात अंजुमन इस्लाम स्कूलने (इंग्रजी माध्यम) ‘ऑक्सफर्ड’चा ६४७ धावांनी धुव्वा उडविला. आझाद मैदानातील ससानियनच्या खेळपट्टीवर पार पडलेल्या या लढतीत ‘अंजुमन’च्या ६५३ धावांच्या महाकठीण आव्हानाचा पाठलाग करताना ऑक्सफर्डकडून फक्त आर्चित उपाध्याय ४ धावा करू शकला. ‘अंजुमन’कडून शाने रझा याने ३ पैकी २ निर्धाव षटके टाकत सात विकेट टिपल्या. त्याच्याच षटकांत एक अवांतर धाव गेली. तसेच शाहीद खानने २.४ षटकांत ४ धावांत ३ विकेट टिपल्या. शाहीदने एक षटक निर्धाव टाकले. ‘ऑक्सफर्ड’चा संपूर्ण संघ ५.४ षटकेच खेळपट्टीवर तग धरू शकला.

मोहम्मद-अफझलची ‘आतषबाजी’

त्याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या अंजुमन इस्लाम हायस्कूलने ४ बाद ६५२ धावांचा डोंगर उभारला तो मोहम्मद हमझा खान (१८८) आणि अफझल शेख (२३४) यांच्या फटकेबाजीमुळे. मोहम्मदने ३३ चौकार आणि एका षटकारासह ९२ चेंडूंत १८८ धावा कुटल्या. तर अफझलने फक्त १०० चेंडूंत तीन षटकार आणि ४३ चौकारांसह २३४ धावा चोपून काढल्या.

स्वानंद पालवमुळे डॉन बॉस्कोचा विजय

सूर कायम राखत स्वानंद पालवने अष्टपैलू चमक दाखवल्यामुळे माटुंग्याच्या डॉन बॉस्कोने चेंबूरच्या स्वामी विवेकानंद हायस्कूलवर १३९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या डॉन बॉस्कोने दंड धावांसह ९ बाद ३३४ धावांचा डोंगर उभारला. स्वानंद पालवने ९० चेंडूंत १०८ धावांची नाबाद खेळी केली. तसेच त्याने गोलंदाजीतही चमक दाखवत सहा षटकांत २६ धावांत ४ फलंदाज गारद केले. स्वानंद सातत्यपूर्ण धावा करत असून हॅरिस शील्डच्या पहिल्या सामन्यात त्याने ८८ धावांची खेळी केली होती. तसेच वरळी करंडकात त्याने १२० धावांची खेळी केली होती. दरम्यान विरारच्या नॅशनल इंग्लिश स्कूलने पोदार आंतरराष्ट्रीय स्कूलवर ३३४ धावांनी विजय मिळवला. आरव सुळे याच्या १३९ धावांच्या खेळीमुळे ‘नॅशनल’ने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावा केल्या. तर आव्हानाचा पाठलाग करताना पोदारचा डाव २२ धावांत गळपटला. पार्थ हलदोणकरने १३ धावांत ६ विकेट टिपल्या. तर मीत दमानियाने ९ धावांत ४ गडी बाद केले.

लक्ष्यवेधक

-‘अंजुमन’च्या प्रभावी गोलंदाजीमुळे ‘ऑक्सफर्ड’चे दहा फलंदाज शून्यावर गारद-‘ऑक्सफर्ड’च्या पाचपैकी चार धावा सलामीवीर अर्चित उपाध्याय याच्या-५.४ षटकांत ‘ऑक्सफर्ड’चा खेळ खल्लास-‘अंजुमन’कडून रझाच्या सात, तर शाहीदच्या तीन विकेट-प्रथम फलंदाजी करणाऱ्या अंजुमनचा ४ बाद ६५२ धावांचा डोंगर-मोहम्मद खानच्या १८८ धावा, तर अफझल शेखचे द्विशतक


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/WxGaf0s

No comments:

Post a Comment