Breaking

Thursday, January 9, 2025

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे सलग दोन विजय, बाद फेरीचा मार्ग झाला मोकळा https://ift.tt/LciFmB3

मुंबई:- महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी "५० व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत" साखळी सामन्यात सलग दोन विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश जिल्हा कबड्डी असो.च्या विद्यमाने रोशनबाग बंदिस्त क्रीडा संकुलात आजच्या सायंकाळच्या सत्रातील ग गटात महाराष्ट्राच्या मुलींनी चुरशीच्या लढतीत चंदीगडला ५१-४७ असे रोखत बाद फेरी गाठण्याचा आपला मार्ग मोकळा केला. पहिल्या डावापासून रंगतदार ठरलेल्या या सामन्यात विश्रांतीला २२-१८ अशी आघाडी महाराष्ट्राकडे होती. मध्यांतरानंतरच्या खेळात आहे ती आघाडी निसटू न देता महाराष्ट्राने आपला विजय निश्र्चित केला. वैभवी जाधव, वैष्णवी काळे यांच्या संयमी दमदार चढाया त्यांना साक्षी गायकवाडची मिळालेली बचावाची साथ याने हा विजय मिळविला. महाराष्ट्रा च्या मुलींची साखळीतील शेवटची लढत उत्तरांचल संघाशी होईल. आज सकाळी झालेल्या कुमारी ग गटात महाराष्ट्राने मणिपूरचा ५२-३० असा पराभव करीत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात ३१-१४ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात सावध खेळावर भर देत गुणांचे अर्धशतक पार केले. साक्षी रावडे हीचा अष्टपैलू खेळ तिला वैष्णवी जाधवची मिळालेली चढाईची, तर सृष्टी मोरेची मिळालेली पकडीची साथ यामुळे १८ गुणांनी महाराष्ट्राने सामना आपल्या बाजूने झुकविला.सायंकाळच्या सत्रात मुलांच्या इ गटात महाराष्ट्राने कर्नाटकला ३३-२२असे रोखत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले. विश्रांतीला २३-११ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला विश्रांतीनंतर कर्नाटकने विजयासाठी चांगलेच झुंजविले. पण पहिल्या डावातील मोठ्या आघाडीमुळे महाराष्ट्राने हा विजय साकारला. अनुज गावडेचा चतुरस्त्र खेळ त्याला समर्थ देशमुख, महेश मोने यांची मिळालेली चढाई पकडीची भक्कम साथ यामुळे महाराष्ट्राने ११गुणांच्या फरकाने विजय मिळविला. महाराष्ट्राची साखळीतील शेवटची लढत दिल्ली संघाशी होईल. सकाळच्या सत्रात झालेल्या मुलांच्या इ गटात महाराष्ट्राने आसामला ३७-०७ असे सहज नमवित साखळीतील पहिला विजय नोंदविला. पहिल्या डावात लोण देत महाराष्ट्राने २०-०४ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात तोच जोश कायम राखत सामना एकतर्फी केला. ओम् कुदळेचा चतुरस्त्र खेळ त्याला आफताब मन्सुरी, अनुज गावडे यांची मिळालेली चढाई पकडीची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. महाराष्ट्राच्या मुलांचा इ गटात समावेश असून दिल्ली, आसाम, कर्नाटका हे अन्य संघाचा या गटात समावेश आहे. तर मुलींचा ग गटात समावेश असून चंदीगड, उत्तरांचल, मणिपूर हे अन्य संघांचा या गटात समावेश आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Vp283MB

No comments:

Post a Comment