मुंबई:- महाराष्ट्राच्या मुलींनी "५०व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. पण उपांत्य फेरीतच त्यांना पराभव पत्करावा लागला. भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असो.ने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. हरिद्वार येथील रोशनबाद बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या उपांत्य फेरीत राज्यातील निवडक खेळाडूंचा भरणा असणाऱ्या साई(भारतीय क्रीडा प्राधिकरण)ने महाराष्ट्राचे आव्हान ४७-२२ असे संपविले. आक्रमक सुरुवात करीत पहिल्या डावात २८-०७ अशी आघाडी घेत साईन सामन्यावर नियंत्रण ठेवले. दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम राखत सामना महाराष्ट्राला डोकं वर काढू दिले नाही. दुसऱ्या डावात महाराष्ट्राच्या वैभवी जाधव, वैष्णवी काळे यांनी थोडा फार प्रतिकार केला. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. या पराभवाने महाराष्ट्राचे उपांत्य फेरीतच स्वप्न भंगले. या अगोदर झालेल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी "सुवर्ण चढाईत" गोवा संघाचा प्रतिकार ४५-४३(२-०) असा मोडत धडाक्यात उपांत्य फेरी गाठली. क्षणा क्षणाला उत्कंठावेधक ठरलेल्या या सामन्यात अखेर महाराष्ट्राने बाजी मारली. अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात मध्यांतराला दोन्ही संघांची १९-१९ अशी बरोबरी होती. पूर्ण डावात गोव्याची शेवटची चढाई असताना ३८-३६ अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. परंतु शेवटच्या चढाईत एक गुण गोव्याला देण्या ऐवजी त्यांनी दोन गुण टिपले आणि सामना ३८-३८ असा बरोबरीत सुटला. बाद फेरीचा सामना असल्याने कबड्डीच्या नियमाने ५-५ चढायांचा डाव खेळविण्यात आला. त्यात देखील पुन्हा ४३-४३(५-५) अशी बरोबरी झाली.या बरोबरीची कोंडी सोडविण्यााठी नियमाप्रमाणे "सुवर्ण चढाई " देण्यात आली. याकरिता पुन्हा नाणेफेक करण्यात आली. नाणेफेकीचा कौल महाराष्ट्राच्या बाजूने लागल्याने महाराष्ट्राने आर्धें काम फत्ते केले. शेवटच्या क्षणापर्यंत काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या सामन्यात हि सुवर्ण चढाई महाराष्ट्राच्या रेखा राठोड हिने केली. तिने आपल्या त्या चढाईत गोव्याचे दोन गडी टिपत संघाला उपांत्य फेरी गाठून दिली. रेखाला वैभवी जाधवची मिळालेली अष्टपैलू खेळाची, तर वैष्णवी काळे, प्रतिक्षा लांडगे यांची चढाई पकडीची साथ यामुळे महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/5dyrwO2
No comments:
Post a Comment