
मुंबई : मुंबईत १४ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सागरी किनारा मार्गाला (कोस्टल रोड) तडे गेल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 'मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत,' अशा शब्दांत आदित्य यांनी टीकास्त्र सोडले. सागरी किनारा मार्गाला तडे गेल्याने तसेच, ठिकठिकाणी डांबराचे पॅच लावण्यात आल्याने महापालिका तसेच, राज्य सरकारवर विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. याचाच धागा पकडत आदित्य ठाकरे यांनी एक्स माध्यमावरून ही टीका केली. 'आम्ही आधीच म्हटले होते, मिंधे जिथे जिथे हात लावतात तिथे तिथे कामे रखडतात, खर्च वाढतात आणि कामाची मात्र वाट लागते. मिंधे व त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ 'रस्त्यावरचा मलिदा' खाण्यात पटाईत आहेत. कोस्टल रोडवर 'हाजी अली ते वरळीपर्यंतच्या' रस्त्यावर केलेले पॅचवर्क हे त्याचंच ढळढळीत उदाहरण आहे,' असे आदित्य यांनी लिहिले आहे. 'आमचे सरकार असते तर उत्तम गुणवत्तेचा कोस्टल रोड २०२३ मध्येच संपूर्ण तयार झाला असता आणि आजवर सायकल ट्रॅक्स, बागा नागरिकांसाठी खुल्या झालेल्या असत्या,' असा दावाही त्यांनी केला. डांबरीकरणामुळे पालिका कोंडीतसागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळी या दरम्यान पुलाचे सांधे मजबूत राहावेत, यासाठी रस्त्याच्या काही भागावर गेल्या वर्षी केलेले मास्टिक आवरण (डांबरीकरण) अद्याप कायम असल्याचे गुरुवारी समोर आले. यानंतर मुंबई महापालिकेची कोंडी झाली आहे. यावर महापालिकेने शुक्रवारी स्पष्टीकरण देत सागरी किनारा मार्गाचे स्वरूप पूर्ववत केले जाणार असल्याचे जाहीर केले. तरी या प्रकरणाची ऑडिटसह चौकशीची मागणी भाजपच्या नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/deJPB6x
No comments:
Post a Comment