
नवी दिल्ली : प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा राजधानीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या सत्तेत पुन्हा महिला मुख्यमंत्री विराजमान होणार आहेत. दिल्लीच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या निमित्ताने याच्याशी जोडलेल्या अशा राजकीय पर्वाची उजळणी करुया, ज्यामुळे दिल्लीच्या राजकारणाला कलाटणी मिळाली होती. ही गोष्ट एका बाजूला केवळ ५२ दिवसांच्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज, तर दुसऱ्या बाजूला तब्बल १५ वर्षे राज्य करणाऱ्या शीला दीक्षित यांची. सुषमा स्वराज यांना केवळ ५२ दिवस मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करता आले. यानंतर त्या भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वाढत्या महागाईच्या तडाख्यामुळे स्वराज यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. दुसरीकडे मात्र, शीला दीक्षित यांनी आपल्या प्रभावी नेतृत्वाने दिल्लीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. १९९३ मध्ये जेव्हा दिल्लीत पहिली विधानसभा निवडणूक पार पडली. तेव्हा ७० पैकी ४९ जागांवर विजय मिळवून भाजपने सत्तास्थापन केली होती. परंतु पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे एकाच कार्यकाळात तीन मुख्यमंत्री बदलले होते. हवाला प्रकरणातील आरोपांमुळे प्रथम मदनलाल खुराणा यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर कांद्याच्या वाढत्या किमती आणि प्रशासनात प्रतिमेला तडा गेल्याने साहिब सिंग वर्मा यांना पदावरून हटवण्यात आले. यानंतर भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्याकडे १२ ऑक्टोबर १९९८ला दिल्लीची सूत्र सोपवण्यात आली, पण त्यांचे सरकार अल्पावधीचे ठरले. फक्त ५२ दिवस त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करता आले. सुषमा स्वराज यांच्या मुख्यमंत्री काळात देशभरात कांदा प्रश्न तापला होता. कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. दिल्लीत कांदा प्रतिकिलो ६०-८० रुपये दराने विकला जात होता. त्यामुळे भाजपसाठी जनतेमध्ये प्रचंड रोष होता. याचा पूरेपूर फायदा काँग्रेसने उचलला आणि कांद्याचे हार घालून सरकारचा निषेध नोंदवला होता. यावेळी सुषमा स्वराज यांनी जनतेला स्वस्त दरात कांदे उपलब्ध करून देण्याची योजना आखली आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. महागाईच्या मुद्द्याचा भाजप सरकारच्या लोकप्रियतेवर दुष्पपरिणाम झाला. राजकीय पटलावर टिकण्यासाठी भाजपने खेळी करत सुषमा स्वराज यांच्यावर पैज लावली. पण दुसरीकडे काँग्रेसने दिल्लीत आणखी महिला नेत्या शीला दीक्षित यांना समोर आणले. शीला दीक्षित यांनी आपल्या साध्या आणि सरळ राजकारणाने जनतेला आकर्षित केले आणि काँग्रेस ५२ जागा आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरली. तर भाजप फक्त १५ जागांवर समाधान मानावे लागले. शीला दीक्षित यांनी दिल्लीत काँग्रेसची पाळेमुळे इतकी मजबूत केली की त्या सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आणि त्यांनी १५ वर्षे दिल्लीवर अधिराज्य केले.भाजपच्या पराभवाचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे पक्षात तीन गट निर्माण झाले - मदनलाल खुराणा गट, साहिब सिंग वर्मा गट आणि सुषमा स्वराज गट. निवडणुकीदरम्यान ही गटबाजी उघडपणे समोर आली, ज्यामुळे पक्ष कमकुवत झाला आणि जनतेचा विश्वास उडाला. याचा परिणाम असा झाला की १९९८ मध्ये सत्ता काँग्रेसच्या हाती गेली आणि भाजप पुन्हा कधीही दिल्लीत सरकार स्थापन करू शकला नाही.१९९८ मध्ये सत्ता गमावल्यानंतर भाजपने अनेक निवडणुका लढवल्या पण दिल्लीत पुन्हा सत्तेत येऊ शकले नाही. सुषमा स्वराज यांच्यानंतर २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष उदयास आला आणि भाजप आणि काँग्रेसला मागे टाकले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oVuWEth
No comments:
Post a Comment