म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी मराठवाड्याला पावसाने झोडपले. विभागात ठिकठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात झाडे उन्मळून पडली. सिल्लोड तालुक्यात वीज कोसळून एक गाय ठार झाल्याची घटना घडली.मराठवाड्यात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. विभागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश पिकांची काढणी झाली असली तरी फळबागांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. गारपिटीमुळे आंबा, मोसंबी फळबागांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. सिल्लोड तालुक्यात गारांचा पाऊस झाला असून शिवना, धोत्रा, मंगरूळ, भवन, पानवडोद, सारोळा या गावांसह सिल्लोड शहराला पावसाने झोडपले. तालुक्यात निल्लोड, सिल्लोड, गोळेगाव बु, अजिंठा या चार मंडळात पावसाची नोंद झाली आहे. फुलंब्रीतही गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. कन्नड तालुक्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. बहिरगाव, जामडी जहागीर, कुंजखेडा परिसरात गारपिटीसह पाऊस झाला आहे. देवगाव रंगारी परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. येथे मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गंगापूर शहरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला आहे. खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी, येसगाव येथे गारपीट झाली आहे; तसेच जालना जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई, पारध, वालसावंगी, वडोद तांगडा परिसरात गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यात शेतीचे मोठे नुकसान झाले असून पारध गावात पिके आडवी पडली आहेत. लातूर जिल्ह्यात लातूर, रेणापूर तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. या जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. बीड, धाराशीव, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पाऊस झाला. कसं असेल आजचं हवामान?दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार पुढील २४ तासात जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. या कालावधीत वारे ताशी ४० ते ४५ किमी वेगाने वाहणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी २४ तासांत छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशीव, बीड आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ ते १२ एप्रिल दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच पावसाची शक्यता कमी आहे, असे कृषी हवामान केंद्राने म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/FZfrPBN
No comments:
Post a Comment