Breaking

Tuesday, April 22, 2025

हम तो बरबाद हो गये...; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे हादरले पर्यटन व्यावसायिक https://ift.tt/X3qeU1m

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक लष्कराच्या अनेक गाड्यांचा ताफा डोळ्यासमोरून गेला. त्यापाठोपाठ बऱ्याच ॲम्बुलन्स गेल्या. हॉटेलचालकाला विचारले, तर ‘हम तो बरबाद हो गये’ एवढे एकच वाक्य त्याने उच्चारले आणि आमच्या सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर, झाल्याचे कळले आणि आम्ही श्रीनगरचा रस्ता धरला...’ हा अनुभव आहे, मंगळवारी दुपारी पहेलगामच्या हॉटेलबाहेर थांबलेल्या एका पर्यटन कंपनी व्यवस्थापकाचा.प्रत्यक्ष घटना पहलगाम मार्केटच्या मागून डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली असली, तरी तिकडे जाणारा रस्ता सर्व निवासी हॉटेलांच्या समोरूनच जात असल्याने नेमके काय होते आहे, हे अनेक पर्यटकांना समजलेच नाही. काश्मीरमध्ये फिरताना लष्कराचा वाहनांचा मोठा ताफा सातत्याने ये-जा करताना दिसतो. मात्र, या वाहनांपाठोपाठ ॲम्बुलन्स अतिशय वेगाने पुढे जायला लागल्यानंतर काही अघटित तर घडले नाही ना, अशी शंका मनात आलीच होती, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ‘हॉटेलबाहरे प्रत्येकाचाच चेहरा चिंताग्रस्त झाल्याने आम्ही आतमध्ये जाऊन हॉटेलचालकाला भेटलो. वर्षानुवर्षे या परिसरात व्यवसाय करण्याचा अनुभव आणि काश्मीर अशांत असतानाच्या परिस्थितीचा सामना केला असल्याने, या हल्ल्याचे काय परिणाम होणार हे सूचित करताना त्याने, ‘हम तो बरबाद हो गये’ एवढेच शब्द उच्चारले. ऐन सुट्ट्यांच्या हंगामात बहरात असलेल्या पर्यटनाच्या हंगामाला खीळ बसणार, या भावना त्याच्या डोळ्यांतून टिपता आल्या. पुढील काही मिनिटांत आम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याचे समजले. त्यानंतरच्या काही मिनिटांत मी बरोबरच्या पर्यटकांना आवराआवर करण्याची सूचना केली आणि अत्यानंदाने पहलगाममध्ये दाखल झालेल्या आमच्यासारख्या अनेकांनी दु:खद अंतकरणाने पहेलगाम मागे ठेवून पुन्हा श्रीनगरचा रस्ता धरला तो भविष्याची अनिश्चितता गृहीत धरूनच..’ हे सांगतानाही त्या सहल व्यवस्थापकाचा कंठ दाटून आला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/suXqcjJ

No comments:

Post a Comment