गोपाळ गुरव : मधील चेन्नईच्या प्रत्येक सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. पण धोनीने याबाबत आपले मौन सोडले आहे. धोनीने आपण कधी निवृत्तीचा निर्णय घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.‘मी अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. सध्या मी ४३ वर्षांचा आहे. आयपीएलचा हा मोसम संपल्यानंतर मी ४४ वर्षांचा होईल. पुढील आयपीएलमध्ये खेळायचे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे दहा महिने आहेत. आयपीएलमध्ये खेळत राहायचे की नाही, हे मी नाही, तर माझे शरीर ठरविणार आहे,’ असे चेन्नई सुपर किंग्ज संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनीने सांगून निवृत्ती बाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या. गेल्या आठवड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात धोनीला चेन्नई संघाला विजय मिळवून देता आला नाही. मागील चार लढतींत धोनीला नाबाद ३०, १६, नाबाद ३०, नाबाद ० अशाच खेळी करता आल्या. लढत अखेरच्या षटकापर्यंत नेऊन संघाला विजय मिळवून द्यायचा, ही धोनीची खासियत होती. मात्र, आता धोनीचा ‘फिनिशिंग टच’ हरवला आहे. वयानुसार त्याच्या फलंदाजीतील ‘इम्पॅक्ट’ कमी झाला आहे. धोनी संघातील एका युवा खेळाडूची जागा अडवित आहे, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत एका पॉडकॉस्टमध्ये बोलताना धोनी म्हणाला, ‘मी आनंदी आहे की दु:खी हे फारसे महत्त्वाचे नाही. जे झाले ते झाले. ते बदलता येणार नाही. काही गोष्टी स्वीकारून पुढे जायला हवे. जे काही झाले त्यात मी काही माझ्या आंतरराष्ट्रीय धावांमध्ये काही धावांची भर घालू शकत नाही. किंवा त्या कोणी कमीही करू शकत नाही.’ धोनी वर्तमानात जगणारा खेळाडू आहे. मात्र, व्यावहारिक बाजू बाजूला ठेवून सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंग सारख्या दिग्गजांना पुन्हा एकदा एकाच संघात एकत्र पाहण्याची इच्छा धोनीने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मला भारतीय खेळाडूंसोबत पुन्हा खेळायला आवडेल. वीरू पा डावाची सुरुवात करतो आहे. सचिन, दादा… एकाच संघात आहेत आणि सर्व जण जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यामुळे सर्वोत्तम अकरा जणांची निवड करणे अवघड आहे. जेव्हा तुम्ही युवराजला सलग सहा षटकार मारताना पाहता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कोणाची फलंदाजी बघायला आवडणार नाही. त्यांनी जे काही भारतासाठी केले आहे, ते पाहण्यात वेगळाच आनंद होता. काही खेळाडूंची गुणवत्ता अफाट होती.’
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6OzRmC0
No comments:
Post a Comment