मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शालेय शिक्षण विभागाने स्कूलबस वाहतुकीसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. बसचालकांची दररोज मद्यपान आणि औषध चाचणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सर्व शाळांसाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.या नियमांनुसार चालक, त्याचा सहायक आणि महिला सेविकांची ड्रग्ज व अल्कोहोल चाचणी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळा केली जाणार आहे. शालेय परिसर, शौचालये आणि इतर संवेदनशील भागांमध्ये देखरेख ठेवण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. शाळा सुटल्यानंतर एकही विद्यार्थी इमारतीत मागे राहणार नाही, याची खात्री करणे शाळांची जबाबदारी असेल.शाळांमध्ये वाहनाच्या तांत्रिक तपासणीसह सुरक्षाव्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. बसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस अनिवार्य असून, दर सहा महिन्यांनी तांत्रिक तपासणी करून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल.खासगी वाहनांनी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही खबरदारी घेणे अपेक्षित आहे. वाहनचालकाची ओळख, पार्श्वभूमी, भूतकाळातील अपघात किंवा हलगर्जीने वाहन चालवण्याचा इतिहास याबाबतची माहिती शाळेला द्यावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. चालकाची ओळखपत्रे पालकांनी स्वतःकडे ठेवावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे. स्कूलबसमध्ये बसण्याच्या क्षमतेनुसारच विद्यार्थी प्रवास करतील, याची दक्षता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक बसमध्ये महिला सेविकेची उपस्थिती अनिवार्य राहील.
मुख्याध्यापकांची जबाबदारी
राज्यात सध्या सुमारे सहा हजार स्कूलबस कार्यरत आहेत. यापुढील काळात शाळा व्यवस्थापनाला बससुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात जबाबदारीने काम करावे लागेल. मुख्याध्यापकांची जबाबदारी यामुळे स्पष्ट झाली असून, वाहतुकीच्या वेळेस विद्यार्थ्यांची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असेल, अशी माहिती स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष, अनिल गर्ग यांनी दिली आहे.ॲलर्ट सिस्टम विकसित करावी!
विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीबाबत तत्काळ माहिती मिळावी, यासाठी शाळांनी ॲलर्ट सिस्टम विकसित करावी, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. मुलगा शाळेतून हरवला किंवा नेमलेल्या बसमध्ये चढला नाही, तर त्याची सूचना पालकांना ताबडतोब मिळणार आहे. काही चालक इतर राज्यांतून आलेले असतात, त्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी करण्यासाठी आरटीओ आणि पोलिस प्रशासनाने शाळांना मदत करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली. राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात यासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचनाही त्यांनी मांडली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WBIKoV8
No comments:
Post a Comment