Breaking

Tuesday, June 17, 2025

शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली महाराष्ट्राची फसवणूक, पहिलीपासून ३ भाषा शिकण्याची सक्ती https://ift.tt/Rw4EBjp

रोहन टिल्लू, मुंबई : ‘पहिलीपासून यंदा तिसरी भाषा शिकवली जाणार नाही आणि दोनच भाषा विद्यार्थ्यांना असतील,’ ही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेली घोषणा फसवणूक ठरवणारा शासन निर्णय मंगळवारी रात्री उशिरा शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. या निर्णयानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकणे अनिवार्य असेल आणि त्यात हिंदीचा समावेश असेल. तसेच किमान २० विद्यार्थ्यांनी इतर भाषेचा पर्याय दिला, तरच हिंदीऐवजी इतर भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल, असे सांगत या शासन निर्णयाने हिंदी सक्तीची वाट मोकळी करून दिली आहे.शालेय शिक्षण विभागाने यंदा हिंदी भाषा पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून घोषित केल्याने प्रचंड विरोध झाला. त्यानंतर दादा भुसे यांच्यावर हा निर्णय मागे घेण्याची वेळ आली. तरीही त्याबाबतचा निर्णय प्रसिद्ध झाला नव्हता. त्यानंतर दादा भुसे यांनी या वर्षी पहिलीपासून तिसरी भाषा नसेल, असे जाहीर केले होते. पण त्याबाबतही लेखी निर्णय जाहीर झाला नाही. अन्यथा हिंदी भाषाच शिकावी लागणार -अखेर शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा शिकणे अनिवार्य आहे. या तिसऱ्या भाषेसाठी हिंदी हा एक पर्याय असेल. पण हिंदी नको असेल, तर वर्गातील किमान २० विद्यार्थ्यांनी इतर भाषेची निवड करणे अपेक्षित आहे. अन्यथा हिंदी भाषाच शिकावी लागणार आहे. ही एकप्रकारे हिंदीची सक्ती असल्याची टीका शिक्षणतज्ञ करत आहेत. महाराष्ट्राची फसवणूक -राज्यातील अनेक शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या आहेत. या शाळांना तर हिंदीशिवाय पर्याय उरणार नाही. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी फसव्या घोषणा करून महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. तसेच अधिकारी शिक्षणमंत्र्यांचे आदेश जुमानत नसल्याचे यातून दिसत आहे, अशी टीका राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी केली. याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे, किंवा अन्य अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KFto6bx

No comments:

Post a Comment