Breaking

Saturday, July 12, 2025

६-०, ६-०.. फायनलमध्ये विजय असावा तर असा, ईगा स्वियातेक ठरली विम्बल्डनची विजेती https://ift.tt/87R1YZD

विनायक राणे : फायनलमध्ये खेळ असावा तर कसा, याचा उत्तम वस्तुपाठ ईगा स्वियातेकने शनिवारी दाखवून दिला. शनिवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिलाच्या एकेरी विभागाची फायनल झाली, त्यावेळी ईगाने प्रतिस्पर्धी खेळाडूला एक गुणदेखील जिंकू दिला नाही आणि तिने विम्बल्डन स्पर्धेतील अव्वल विक्रम आपल्या नावावर केला. ईगा स्वियातेकने शनिवारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत तिने अवघ्या ५७ मिनिटांत अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हा हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवत प्रथमच या जेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखादा अंतिम सामना एवढा एकतर्फी झाला. १९११नंतर पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने एकही गेम न गमावता जेतेपद पडकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या इतिहासातही असा योग १९८८नंतर जुळून आला. त्यावेळी स्टेफी ग्राफने नताली झ्वेरेव्हा हिला फ्रेंच ग्रँडस्लॅममध्ये नमवताना एकही गेम गमावला नव्हता. फक्त फायनलच नव्हे, तर स्वियातेकने आपल्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात दमदार कामगिरी केली. तिने या प्रवासात फक्त एकदाच सेट गमावला हे विशेष. 'जेतेपद अन् तेही असे... याची कल्पनाही केली नव्हती. कारण या स्पर्धेतील माझी आधीची कामगिरी साजेशी झालीच नव्हती. फ्रेंच आणि अमेरिकन अशा दोन ग्रँडस्लॅममध्ये बाजी मारल्यानंतर माझ्या गाठीशी बऱ्यापैकी अनुभव जमा झाला आहे, असे मला वाटले होते, पण विम्बल्डन जिंकण्याचा आनंद एवढा मोठ्ठा असेल, याची अपेक्षा मात्र मी केली नव्हती', असे ईगा म्हणाली. स्वियातेकने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा चारवेळा जिंकली असून अमेरिकन ग्रँडस्लॅम तिने एकदा जिंकली आहे. एकतर्फी पराभवामुळे अमांडाला सहाजिकच भावना अनावर झाल्या. तिला रडू कोसळले, पण खिलाडूवृत्तीने ईगाने आपल्या या प्रतिस्पर्धीला सावरून घेतले. 'अमांडा आज काहीही घडले असू देत... पण गेले दोन आठवडे दमदार कामगिरी करूनच तू इथवर आलीस हे विसरू नकोस. आजचा दिवस कदाचीत तुझा नसेल, पण म्हणून तुझे गुण, कौशल्य, हुशारी यामुळे तसूभरही कमी होणार नाही', असे ईगा म्हणाली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ynu08ot

No comments:

Post a Comment