संजय घारपुरे : इंग्लंडचा क्रिकेट संघ कायम वेगाने धावा करण्यास पसंती देतो. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या क्रिकेट कसोटीत टिच्चून मारा केला आणि त्यांनी धावगतीस वेसण घातली. त्यामुळे भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलेच वठणीवर आणले. कारण जो रुटचा अपवाद वगळता एकाही इंग्लंडच्या खेळाडूला आपली छाप पाडता आली नाही. त्यामुळे पहिल्या दिवसावर भारताचाच वरष्मा राहिल्याचे पाहायला मिळाले. जो रूटच्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवशी ४ बाद २५१अशी मजल मारली आहे.इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत सुरुवातीस तरी आपले `बॅझबॉल' धोरण बाजूला ठेवले. नितिश कुमार रेड्डीने एकाच षटकांत दोघांना बाद केले, पण त्यापूर्वीपासूनच इंग्लंडने खेळपट्टीस उभे राहण्यास आपली पसंती असल्याचे दाखवले होते. झॅक क्रॉली आणि बेन डकेटने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांच्या भागीदारीस ८२ चेंडू घेतले, तर ऑली पोप आणि जो रुट यांची तिसऱ्या विकेटची भागीदारी २११ चेंडूंची होती. त्यात १०९ धावाच झाल्या. त्यावरून इंग्लंडच्या फलंदाजांचा बचावात्मक पवित्रा लक्षात येतो. मोहम्मद सिराजने आम्हाला `बॅझबॉल' बघायचे आहे, अशी शेरेबाजी रुटला उद्देशून केली. त्यानंतरही इंग्लंड शांत होते. `बॅझबॉल'मध्ये इंग्लंड कायम धावांच्या पाठलागास पसंती देते. मात्र बेन स्टोक्स-ब्रेंडन मॅकलम यांच्याकडे संघाची धुरा आल्यापासून इंग्लंडने केवळ दुसऱ्यांदा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. घरच्या मैदानावर खेळणारे इंग्लंड आक्रमक सुरुवात करतील अशी अपेक्षा होती. मात्र जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराजने माऱ्यात अचुकता राखत इंग्लंडच्या फलंदाजांना सतावले, पण त्यांना विकेटपासून वंचित रहावे लागले. चेंडूचा टप्पा काहीसा उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर ठेवत इंग्लंडच्या फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडण्याची भारताची योजना अमलात आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी हे चेंडू सोडून देण्यासच पसंती दिली. लॉर्ड्स मैदानावरील उताराशी जुळवून घेण्यासाठी भारतीय गोलंदाजांना वेळ लागला. बुमराहने मैदानाच्या दोन्ही एंडकडून गोलंदाजी केली. आकाश दीपला दुसऱ्या बाजूने गोलंदाजी देण्याऐवजी शुभमन गिलने नितिश रेड्डीकडे चेंडू सोपवला. भारताच्या प्रमुख गोलंदाजांनी रोखून धरलेल्या डकेट आक्रमणास उत्सुक होता. त्याने नितिशचा उसळता चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला, पण पंतने झेल टिपला. पुढच्याच चेंडूवर पोपचा झेल गिल गलीत टिपू शकला नाही. त्यावेळी बाहेर जाणाऱ्या चेंडूवर पोप चकला होता. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर नितिशने क्रॉलीला चकवले. यष्टींच्या रेषेत पडलेला चेंडू क्रॉलीच्या बॅटला चाटून पंतच्या ग्लोव्हजमध्ये स्थिरावला.या कसोटीने पुन्हा चाहते पाच दिवसांच्या खेळाचे चाहते असल्याचे दिसले. लॉर्ड्स परिसरातील रस्ते स्टेडियमकडे येणाऱ्या चाहत्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. विशेषतः सेंट जॉन्स वूड मेट्रो स्थानकापासून स्टेडियमकडे येणाऱ्या रस्त्यावर गर्दी होती. त्यात भारतीय वंशाचे जास्त होते. बेंगळुरूहून आलेल्या एका कुटुंबाने तीन तिकीटांसाठी १२०० पौंड मोजले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uWoLbT
No comments:
Post a Comment