म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशकात शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर नाशिकचा गड सावरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय व्यूहरचना या दौऱ्यात निश्चित केली जाणार आहे. त्यासाठीची तयारी पक्षाकडून सुरू झाली असून, आज, मंगळवारी (दि.१५) पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.शिवसेनेतील बंडानंतर नाशिकचा ठाकरे गटाचा गड अभेद्य होता. परंतु, कालांतराने नाशिकमधून ठाकरे गटात आऊटगोईंग सुरू झाले आहे. उपनेते सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदेंसह २६ माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. पाठोपाठ उपनेते सुनील बागूल, मामा ठाकरे यांनीही भाजपची वाट धरल्याने ठाकरे गटाची पुरती वाताहत झाली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी ‘उबाठा’ला जमीनदोस्त करण्याची गर्जना भाजपचे नेते तथा राज्याचे यांनी केली होती. नाशिकमधील उरल्यासुरल्या ‘उबाठा’ला सुरूंग लावून महाजन यांनी महिनाभरातच आपला शब्द खरा केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठाकरे यांनी आपले शिलेदार पाठवत ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न केला. परंतु, त्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे आता खुद्द उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून, जुलैअखेर अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते नाशिक दौऱ्यावर येत असून, पक्षाचा गड सावरण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. नियोजनासाठी मंगळवारी बैठकशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी होऊ घातलेल्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. ठाकरेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची व दौऱ्याची रुपरेषा ठरविण्यासाठी आज, मंगळवारी दुपारी ४ वाजता शालिमार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iUSD0Ey
No comments:
Post a Comment